पुणे - कधीकाळी संस्कृतीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसांत गुंडांच्या दहशतीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भर रस्त्यात मारहाण, गोळीबार, गँगवार आणि ताबेमारी अशा घटना सलग घडत असताना, या सगळ्यावर आमदार-खासदार गप्प का? असा सवाल पुणेकरांना पडू लागला आहे.
गँगस्टर गजा मारणेच्या टोळीने तरुणाला मारहाण केली, निलेश घायवळच्या गुंडांनी भर चौकात गोळीबार केला, बंडू आंदेकरने स्वतःच्या नातवाचा गँगवारमधून खात्मा केला, तर टिपू पठाणच्या टोळीने खुलेआम मारहाण केली. या घटनांवरून शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यांसारख्या नामवंत गुंडांची ओळख परेड घेऊन खळबळ उडवून दिली होती. काही काळ गुंडांचा धाक बसल्याचा भास झाला, मात्र आता हेच गुंड पुन्हा मोकाट फिरताना दिसत आहेत.
गजा मारणेच्या गुंडांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण केली होती. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र वाद वाढल्याने कारवाई करावी लागली. तरीही आरोपी रुपेश मारणे मागील पाच महिन्यांपासून फरार असून पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
सप्टेंबरमध्ये आंदेकर टोळीने नऊ गोळ्या झाडून आयुष कोमकर या निष्पाप तरुणाचा जीव घेतला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या घटनेबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती, मात्र तरीही रक्तपात रोखण्यात पोलीस अपयशी ठरले. दुसरीकडे २८ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला टिपू पठाण बेधडक वावरत होता. त्याचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
निलेश घायवळ टोळीने नुकताच कोथरूडमध्ये गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून दहशत माजवली. ही घटना पोलीस ठाण्याच्या जवळ घडली, तरी घटनास्थळी पोलीस पोहोचायला अर्धा तास लागला. त्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि धाक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
पूर्वी गँगवॉर फक्त टोळ्यांपुरता मर्यादित होता. मात्र आता सर्वसामान्य पुणेकरांनाही याचा फटका बसू लागला आहे. वाहनं फोडली जात आहेत, तरुणांना रस्त्यावरच बेदम मारहाण केली जात आहे, आणि नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
यातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पुण्याचे अनेक राजकारणी या घटनांकडे डोळेझाक करत आहेत. काही नेते गुंडांच्या व्यासपीठावर दिसलेही आहेत. त्यामुळे राजकीय पाठबळामुळेच गुंडांचा दादागिरीखोरपणा वाढत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.