पुणे : लक्झरी कारने जात असताना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका व अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा याने कारची पुढची आणि मागची नंबप्लेट काढून त्याची विल्हेवाट लावत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाइल हस्तगत करणे बाकी आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी गौरव आहुजाच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे.पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. अज्ञात इसमाने व आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी गुन्ह्यातील पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने नंबर प्लेटची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (दि. १०) न्यायालयास दिली.गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कोठेकोठे गेले होते? कोणत्या ठिकाणावर त्यांनी अमली पदार्थ अथवा मद्य प्यायलेले होते? याबाबतची माहिती आरोपींकडून घ्यायची आहे. गौरव याने गुन्हा केल्यानंतर जप्त केलेल्या कारपासून तो कसा, कोणत्या मार्गे आणि कोणासोबत परत आला याबाबत तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये व गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यामध्ये आरोपीला कोणी मदत केली होती, याचा शोध घेतला जात आहे. आरोपींना आठवड्याच्या कोठडीचा युक्तीवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केला. बचाव पक्षातर्फे अॅड. पुष्कर दुर्गे आणि अॅड. सुनील रामपुरे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
गौरव आहुजाचा प्लॅन फसला..! कारची नंबरप्लेट बदलून पुरावा नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:37 IST