वाघोली : पाणीच्या मोठ्या टाक्या टेम्पोत ठेवून पाणी टेम्पोने दोन वर्षांच्या मुलाला चिरडले. टेम्पो चालक हा सतरा वर्षांच्या असल्याने त्याच्या वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. मल्हार अक्षय चोपडे (वय २) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याचे वडील संतोष बाळासाहेब सरडे (वय ३९) याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अथर्व वॉटर सप्लायर्सच्या टेेम्पोमधून पाणी दिल्यानंतर अल्पवयीन चालकाने गाडी पुढे नेत असताना गाडीचा धक्का चिमुकल्या मल्हार याला बसला. त्यामुळे तो टेम्पोच्या समोरील चाकाखाली चिरडला गेला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
त्याला वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अल्पवयीन चालकाकडे परवाना मिळू शकत नसतानाही त्याच्या वडिलांनी त्याला टेम्पो चालवायला दिल्याने वडील संतोष बाळासाहेब सरडे (रा. पेरणे) याला अटक करण्यात आली आणि मुलाला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याचा तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत.