इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ?
By किरण शिंदे | Updated: December 12, 2025 16:59 IST2025-12-12T16:57:56+5:302025-12-12T16:59:16+5:30
- रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला

इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ?
पुणे - पुण्यातल्या काळेपडळ परिसरातल्या सामान्य कुटुंबातल्या दोन अल्पवयीन मुली. एकीचं वय १७ तर दुसरीचं १५.. गरीब कुटुंब, साधं आयुष्य… पण मैत्री जबराट! रोज एकत्र कामाला, रोज एकत्र घरी. सर्व काही नियमित. मात्र एका इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टने या दोन्ही मुलींचं आयुष्य पार बदलून गेलं.. यातील १७ वर्षाच्या मुलीची ओळख इंस्टाग्रामवरून राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुरेश कुमार प्रजापती (वय २१) या तरुणासोबत झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.. आणि ही मुलगी त्याच्यासाठी वेडीपिशी झाली.. इतकी की त्याच्यासाठी काहीही करायला तयार. सुरेशनेही तिला मग राजस्थानला बोलावलं…तिनेही कसलाच विचार न करता जायचं ठरवलं… आणि ही गोष्ट १५ वर्षाच्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रीणही तयार.. आणि दोघींनीही २८ नोव्हेंबर रोजी कामाला जात असल्याचं सांगून थेट मुंबई, आणि तिथून राजस्थान गाठलं.
इकडे रात्रभर मुली घरी न आल्याने आई–वडिलांची तारांबळ उडाली.. त्यांनी रात्रभर वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दिली. दोन्ही मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलीसही अलर्ट झाले..२९ नोव्हेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.. तपासादरम्यान या मुलींचं आणि संशयित इसमाचं लोकेशन राजस्थान दिसत होतं..गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी एक पथक तयार केलं..पथकातील सपोनी अजय हंचाटे आणि पोलीस कर्मचारी शाहिद शेख, महादेव शिंदे, शशिकांत नाळे आणि गणेश माने तत्काळ राजस्थानला रवाना झाले.
एका संशयित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून अपहत मुलीच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर व्हॉइस मेसेज यायचे. आणि मोबाईल बंद व्हायचा.. लोकेशन दाखवायचं मारवाड जंक्शन, राजस्थान.. तपास पथकातील पोलिसांनी वापी,सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाड, जंक्शन, राणी, पाली, जोधपुर असा तब्बल 3300 किमीचा प्रवास केला.. आणि एका मुलीसह सुरेश कुमार वडदाराम प्रजापती (वय २१) याला ताब्यात घेतलं. मात्र पोलिस आल्याचा सुगावा लागताच दुसरा आरोपी आणि मुलगी परागंदा झाली.
आरोपी सुरेशकुमारला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला..चौकशीदरम्यान त्याने मुलींना फुस लावल्याचं कबूल केलं..इंस्टाग्रामवर त्याची फक्त एकीशी ओळख झाली होती..पण पुण्यातून दोघी आल्याने दोघींना ठेवणं त्याला शक्य नव्हतं..मग त्याने मित्र सुरेश कुमार मोहनलाल राणाभील (वय ३१) याच्यासोबत तिची ओळख करून दिली. आणि ते दोघे एकत्र राहू लागली..
राजस्थानमध्ये गेलेल्या पथकाने शोध घेऊन दुसऱ्या संशयितालाही बेड्या ठोकल्या.. पोलिसांनी या दोन्ही मुलींना सुखरूप घरी आणलं.तर अल्पवयीन मुलींना फूस लावून राजस्थानला पळवून नेल्याबद्दल दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या...