पुणे : अश्लील व्हिडिओ पाठवून एका तरुणीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. तरुणीचे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करून त्यावर तिला हा व्हिडिओ पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी, २२ वर्षीय तरुणीने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मे महिन्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीच्या नावे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केले. त्यावर अश्लील व्हिडिओ पाठवून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पैसे दिले नाहीत तर तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला शिवीगाळ करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.