पुण्यात एक धक्कादायक घटना सोमवारी (२८ जुलै) घडली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केली. तरुणाने ऑफिसमध्ये असतानाच अचानक सातव्या मजल्यावरून उडी मारली आणि स्वतःला संपवले. सकाळी घटना घडली. या घटनेने आयटी पार्कमध्ये खळबळ उडाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पियूष अशोक कावडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आयटी इंजिनिअर होता. सोमवारी सकाळी तो ऑफिसला आला. ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती. छातीत दुखत आहे, असे सांगून तो मीटिंग रुममधून बाहेर पडला.
सातव्या मजल्यावरून मारली उडी
पियूषने मीटिंग रुम सोडली. त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरूनच उडी मारली. खूप उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पियूषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पियूषचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी याबद्दल त्याच्या घरच्यांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पियूष मूळचा नाशिकचा आहे. तो हिंजवडी आयटी पार्कमध्ये असलेल्या अॅटलास कॉपको ग्रुप या कंपनीमध्ये कार्यरत होता.
पियूष कावडेने एका महिन्यापूर्वीच कंपनी नोकरी सुरू केली होती. त्यामुळे अचानक असं काय झालं की, पियूषने स्वतःलाच संपवले? त्याच्या आत्महत्येचा कारणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.