विमान प्रवासावेळी गांजा बाळगल्याने आयटीमधील तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:32 IST2025-12-14T11:32:12+5:302025-12-14T11:32:43+5:30
हा प्रकार विमानतळावरील बॅग चेकिंग काउंटरवर गुरुवारी (दि. ११) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

विमान प्रवासावेळी गांजा बाळगल्याने आयटीमधील तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : डोमेस्टिक विमान प्रवासात बॅग चेक करत नाही, हा समज आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणाला महागात पडला. खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा तरुण त्यांच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी निघाला होता. लोहगाव विमानतळावर बॅगेची तपासणी करताना त्यात लायटर सापडले. कर्मचारी बॅगेतून लायटर काढत असताना त्याबरोबर प्लॉस्टिकच्या दोन पुड्या मिळाल्या. त्या गांजाच्या पुड्या असल्याचे आढळून आले. विमानतळ पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
अमित जियालाल प्रजापती (२८, रा. गुलमोहर सिटी, खराडी रोड, मूळ रा. जगदीशपूर, ता. निझामाबाद, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सुजित बालाजी कागणे (३५, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमानतळावरील बॅग चेकिंग काउंटरवर गुरुवारी (दि. ११) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित प्रजापती हा खराडीतील एका आयटी कंपनीत कामाला आहे. तो पुणे ते वाराणसी या इंडिगोच्या विमानाने गावी जात होता. त्याने बॅग चेक करण्यासाठी दिल्या. फिर्यादी यांनी बॅग चेक केली, तेव्हा मशीनमध्ये एका बॅगमध्ये लायटर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बॅग रिजेक्ट केली. प्रत्यक्ष बॅग चेक करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवली. बॅगेमध्ये लायटर व प्लास्टिकच्या दोन पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता तो १२ ग्रॅम असल्याचे दिसून आले.
डोमेस्टिक विमान प्रवासात बॅगांची तपासणी करत नाही, असा समज असल्याने त्याने लायटर व गांजा बॅगेत ठेवला होता. लायटरमुळे बॅगेतील गांजाही सापडला. विमानतळ पोलिसांनी हा गांजा जप्त करून प्रजापती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पुढील माने तपास करत आहेत.