Sahyadri Hospital: सह्याद्री रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
By किरण शिंदे | Updated: December 11, 2025 09:33 IST2025-12-11T09:33:09+5:302025-12-11T09:33:36+5:30
Pune Sahyadri Hospital: मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

Sahyadri Hospital: सह्याद्री रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
पुणे - हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान एका ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयातील उपकरणांची तोडफोड करून गोंधळ घातला. शिवसेनेचे वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्यानंतर या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे म्हणत नातेवाईकांनी याठिकाणी आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तोडफोडीत सहभागी असलेल्या चार जणांना ताब्यात घेतले. तर एकूण आठ जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अजय केरू सपकाळ, कुणाल हनुमंत सपकाळ, शुभम संजय सपकाळ, गौरव गणेश सपकाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव हनुमंत सपकाळ आणि विनायक अजय सपकाळ यांचा समावेश आहे. सर्वजण उद्योगनगर, महमदवाडी, हडपसर येथे राहणारे आहेत. रुग्णालयात झालेल्या तोडफोडीमुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण ?
अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत. अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला साडेबारा वाजता अल्सरच ऑपरेशन होतं. त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं. दोन दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं. 28 तारखेला ऑपरेशन झालं. त्यानंतर दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले. दोन दिवसात ते शुद्धीवर आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काढलेलं होतं. त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या. दोन दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे सहा-सात टाके त्यावेळेस तुटले. याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायला घेऊन गेले.
अल्सरच ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त इन्फेक्शन आहे इतकच सांगत राहिले. डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे. शिंदे साहेब मी तुम्हाला सांगत आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला हा न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील. तोडफोड कोणी केली याची आम्हाला कल्पना नाही. पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयाच मारण्याचे काम आहे. हे लोक इन्शुरन्स चे पैसे उकळतात आणि माणसं मारतात. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याचा राग मनात धरून त्याची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे.
हिंसक प्रकारांचा आम्ही तीव्र निषेध करतो
सह्याद्री हॉस्पिटलने म्हटले आहे की, रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. हा ७६ वर्षीय रुग्ण २८ नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता. त्याचे मल्टी-ऑर्गन फेल्युअर झाले होते. शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आले होते. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नांनंतर आणि सर्व योग्य, पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही, रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखीन बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते.