पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न;शिवीगाळ करत धमकावणाऱ्या एकाला अटक
By किरण शिंदे | Updated: May 29, 2025 10:36 IST2025-05-29T10:35:30+5:302025-05-29T10:36:23+5:30
आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न;शिवीगाळ करत धमकावणाऱ्या एकाला अटक
पुणे - पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी शंकर धुमाळ हा वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. सतत होणाऱ्या या प्रकारामुळे आमदार व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान सुरुवातीला आमदारांच्या वतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार
सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शंकर धुमाळ याला अटक केली.
आरोपी शंकर धुमाळ याच्या विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1) भारतीय दंड संहिता कलम 352 (उपद्रव करणे), 351(2)(3) (आक्रमणाची धमकी), 132 (सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला), 333 (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणे), पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, 1922 अंतर्गत कलम 3 या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करत त्याला बुधवारी अटक केली.