- किरण शिंदेपुणे - विजापूर जिल्ह्यातील उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या दीपा उर्फ देवकी गुरूसंगप्पा म्यागेरी (वय २२) या तरुणीने पुण्यातील हडपसर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपा हिचा विवाह काही महिन्यांपूर्वी प्रसाद पुजारी याच्याशी झाला होता. सासरकडील नातेवाईकांच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.दीपा ही कला शाखेत पदवीधर असून कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात महिलांना आर्थिक साक्षर करण्याचे कार्य करत होती. तिने गावातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन केला होता. तिच्या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने तिला अधिकृत बचत गट प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.लग्नावेळी दीपाच्या कुटुंबीयांनी एक तोळा एंगेजमेंटमध्ये आणि पाच तोळे लग्नात सोने दिले होते. त्यासोबतच १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च करत विवाह मोठ्या थाटात पार पाडण्यात आला होता. तरीही सासरकडून सतत हुंड्याचे आणि मानपानाचे टोमणे मारले जात होते. लग्नानंतर काही दिवसांनी दीपाच्या मामाचा मृत्यू झाल्याने ती मूळ गावी गेली होती. त्यावेळी तिचे सासरे देखील सोबत होते, पण अंत्यविधीच्या दिवशीच त्यांनी तिला परत पुण्यात नेले. त्या काळात दीपाने एकदाच तिच्या आईला त्रास होतोय, असे सांगितले होते.सोमवारी (दि. १९ मे) पुजारी कुटुंबाकडून दीपाच्या नातेवाईकांना फोन आला की दीपा आणि तिचा पती प्रसाद यांच्यात वाद झाले असून त्यांनी विष घेतले आहे. पुण्याच्या वाटेवर असतानाच कुटुंबीयांना दुसरा फोन आला की दीपाचा मृत्यू झाला आहे. मात्र पुण्यात पोहचल्यावर एका खाजगी रुग्णालयात तिचा मृतदेह नव्हता. नंतर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे दीपाचा मृतदेह तिथे सोडून पुजारी कुटुंब पसार झाले होते.या घटनेनंतर दीपाचे वडील गुरूसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती प्रसाद पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्दैव म्हणजे, घटना घडून दोन दिवस उलटल्यानंतरही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीपाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:49 IST