Pune Crime: लग्नाला २ महिने..तरीही पती जवळ येईना; पत्नीची पोलिसात धाव, पुढे काय घडलं?
By किरण शिंदे | Updated: December 2, 2025 18:25 IST2025-12-02T18:24:47+5:302025-12-02T18:25:49+5:30
- येरवडा पोलिस ठाण्यात पतीसह घरातील ५ जणांवर गुन्हा

Pune Crime: लग्नाला २ महिने..तरीही पती जवळ येईना; पत्नीची पोलिसात धाव, पुढे काय घडलं?
पुणे - पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका २९ वर्षीय विवाहितेने लग्नानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार पोलिसांत दाखल केली. लग्न होऊन दोन महिने झाल्यानंतरही पती तिच्याजवळ येत नव्हता, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत नव्हता. आणि पत्नी जेव्हा पुढाकार घ्यायची तेव्हा पती बाहेर निघून जायचा. पतीच्या या वागण्याची घरात तक्रार केल्यानंतर तिला मारहाण केली गेली. इतकेच नाही, तर तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटकेही देण्यात आले. यानंतर या नवविवाहितेने पोलिसात तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या महिलेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भा.दं.वि. कलम ८५, ३१८(२), ११५(२), ३५१(१), ३५२, ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचे लग्न ११ एप्रिल २०२५ रोजी येरवड्यातील ३३ वर्षीय व्यक्तीशी झाले. मात्र विवाहानंतर काहीच दिवसांनी तिच्यासाठी नरकयातना सुरू झाल्या. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पहिल्याच दिवसापासून पती तिच्यापासून दूर जायचा. ती जेव्हा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायची, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायची, तेव्हा आरोपी पती घरातून बाहेर निघून जायचा आणि बाहेर जाऊन झोपायचा. हा संपूर्ण प्रकार १५ जून २०२५ पर्यंत, म्हणजे जवळपास दोन महिने सुरू होता.
या विवाहितेने पतीच्या या वर्तणुकीबद्दल सासऱ्यांसह घरातील इतर सदस्यांना सांगितले होते. मात्र मदत करण्याऐवजी त्यांनीच तिला “याबद्दल बाहेर कोणाला सांगायचं नाही,” अशी धमकी देत गप्प बसवले. पीडितेने पुन्हा एकदा घरातील लोकांना याबद्दल सांगितले असता त्यांनी तिचा छळ सुरू केला. आरोपी पतीने तर यावेळी कहरच केला. फिर्यादीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर आणि मांडीवर सिगारेटचे चटके दिले, हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला.
अत्याचारांची हद्द ओलांडल्यानंतर अखेर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. येरवडा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार पतीसह घरातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.