सीएनजी वाहने झाली उदंड; पंप मात्र केवळ १२४; गॅस भरण्यासाठी रिक्षा, कॅब, खासगी गाड्यांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:12 IST2025-07-17T12:11:37+5:302025-07-17T12:12:13+5:30
- शहर परिसरात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या सीएनजीवरील रिक्षा आणि कॅबची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे.

सीएनजी वाहने झाली उदंड; पंप मात्र केवळ १२४; गॅस भरण्यासाठी रिक्षा, कॅब, खासगी गाड्यांच्या रांगा
- अंबादास गवंडी
पुणे : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे अनेक वाहनधारक सीएनजी वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सीएनजी वाहन संख्या पाच लाखांवर आहे. परंतु या दोन्ही शहरांमध्ये चाकण आणि रांजणगाव एमआयडीसीत १२४ सीएनजी पंपांद्वारे इंधन पुरवठा केला जातो. परंतु उपलब्ध सीएनजी पंप अपुरे पडत असून, गॅस भरण्यासाठी रिक्षा, कॅब आणि खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गैरसोयीचा फटका बसत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सी (एमएनजीएल) आणि ग्रामीण भागात टोरंट कंपनीकडून सीएनजी पुरवठा केला जातो. पर्यावरणपूरक आणि तुलनेने दर कमी असल्याने वाहनधारक सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) वाहन घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खासगी आणि कॅब व्यवसाय करण्यासाठी सीएनजी वाहन खरेदी करत आहेत. परंतु गेल्या एक ते दोन महिन्यांपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीएनजीला काही प्रमाणात मागणी वाढल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे काही वेळा वाहतूक कोंडी होत आहे. टॅक्सी, रिक्षा, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, तसेच खासगी चारचाकी वाहनधारकांना सीएनजी भरण्यासाठी एक ते दोन पंपांवर ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे पंप वाढविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
रिक्षा आणि कॅबच्या रांगा
शहर परिसरात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या सीएनजीवरील रिक्षा आणि कॅबची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे. शिवाय सकाळच्या सत्रात रिक्षाला सीएनजी पुरवठा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रात शहरातील सर्व प्रमुख पंपांवर गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. राज्यातील सर्वांत जास्त सीएनजी वाहने पुणे शहरात आहेत. परंतु सध्या उपलब्ध असलेले १२४ पंप हे अपुरे ठरत आहेत. त्यामुळे नाहक मनस्ताप वाहनधारकांना होत आहे.
सहा महिन्यांत १५ पंप उभारणार
वाढत्या वाहन संख्येमुळे महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सीकडून (एमएनजीएल) सीएनजी पंप वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सर्वेक्षण सुरू असून, लवकरच याचे काम सुरू होणार आहे. पुढील चार ते पाच महिन्यांत शहर परिसरात १५ सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सीच्या (एमएनजीएल) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
वेळ लागत असल्याने रांगा
रिक्षा, कॅब व इतर वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल इंधन भरण्यासाठी कमी कालावधी लागतो. तुलनेने सीएनजी भरण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे सीएनजीवरील वाहन संख्या कमी असून, इंधन भरण्यासाठी रांगा लागलेल्या दिसतात.