शहराची ओळखच बदलली; 'सायकलीचे शहर'वर 'मोटारबाईक सिटी'चा शिक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:10 IST2025-12-12T10:09:58+5:302025-12-12T10:10:18+5:30
- ठिकठिकाणचे सायकल मार्ट झाले बंद, आता सायकली उरल्या केवळ व्यायाम, स्पर्धेपुरत्या

शहराची ओळखच बदलली; 'सायकलीचे शहर'वर 'मोटारबाईक सिटी'चा शिक्का
पुणे : ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख असलेले पुणे मागील काही वर्षांत ‘मोटारबाईक सिटी’ म्हणून ओळखले जात आहे. लोकसंख्येच्या निम्मी म्हणजे ४० लाखांपेक्षा अधिक वाहनांची संख्या झाली आहे, तर सायकल मार्ट मात्र बंद पडले आहेत. सायकली आता फक्त व्यायाम किंवा स्पर्धेपुरत्याच उरल्या आहेत.
अवघ्या एक हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर व दरमहा १२०० रुपयांचया हप्त्यावर मोटारसायकली मिळू लागल्या व सायकली विकत घेणे कमी-कमी होत गेले. सायकल चालवत कार्यालयात जाणारा कामगार हे एकेकाळी पुण्यातील प्रेस्टिजस विषय होता. ते चित्र आता धूसरच नाही, तर संपूर्णपणे पुसले गेले आहे. शाळा महाविद्यालयातील मुलेही आता सर्रास स्कूटर किंवा मोटारसायकल चालवतच जातात. मुली, महिला व इतकेच काय, वृद्धाही आता स्वयंचलित दुचाकीलाच महत्त्व देत असतात. घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या महिलाही आता नवी गाडी विकत घेतात व वेळ वाचवून कामाचे एक घर वाढवतात, त्यातून गाडीचा हप्ता जमा करतात.
स्वयंचलित दुचाकींच्या या आक्रमणामुळे शहरातील सायकलींचे अस्तित्व जवळपास संपून गेले आहे. आता सायकली वापरल्या जातात त्या वजन कमी करण्यासाठी किंवा मग व्यायाम म्हणून. त्यामुळे त्या सायकलीही नव्या मॉडेलच्या, आकर्षक, वजनाला हलक्या अशा आहेत. किमती पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त असूनही त्यांना मागणी आहे.
सायकलींच्या वापरात घट होण्याला वाहतुकीची कोंडी, दूषित हवा, सायकल लेनवरील अतिक्रमण, असुरक्षित रस्ते ही प्रमुख कारणे असल्याचे सायकलप्रेमींचे म्हणणे आहे.
वाहतूक विभागाच्या अंदाजानुसार, मागील चार वर्षांत पुण्यातील वाहनसंख्या तब्बल ३०–३५ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच्या उलट, शहरातील सायकल विक्री सतत घटत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. सायकल लेन तुटक, अपुरी आणि अनेकदा अतिक्रमणांनी भरलेली असल्याने नियमित प्रवासासाठी सायकलीचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसते. परिणामी, सायकल आता दैनंदिन प्रवासाचे साधन राहिले नसून ती ‘वीकेंड स्पोर्ट’ किंवा ‘फिटनेस’पुरती मर्यादित झाल्याचे वाहतूक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
सायकल वापरातील घसरणीचा मोठा फटका शहरातील सायकलींच्या दुकानांना बसला. तासिका तत्त्वावर सायकल वापरासाठी देणारी, सायकलींचे पंक्चर काढणारी, दुरुस्ती करणारी दुकाने आता बंदच झाली आहे. त्यातील काहींनी काळाचा महिमा ओळखून आपल्या जागेत सायकल मॉल सुरू केले आहेत. व्यायामाच्या सायकली ते विकतात. शाळेतील मुलांसाठी, मुलींसाठी आकर्षक मॉडेलच्या नव्या सायकली त्यांनी ठेवल्या आहेत. त्यांना थोडी मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. मात्र तरीही शहरातील रस्ते जोपर्यंत सायकल चालवण्यासाठी योग्य होत नाहीत, तोपर्यंत सायकलींना मागणी वाढणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
सायकलींचा वापर असा थांबलेला असला तरीही पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, व्यायाम, वजन कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे व एकूणच वैयक्तिक आरोग्य यांसाठी सायकलच उपयोगी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महापालिका, वाहतूक विभाग, पथविभाग यांनी रस्ते, सायकल लेन व्यवस्थित ठेवल्या; तर नागरिकांकडूनही सायकलला पसंती दिली जाईल, असे त्यांना वाटते. तसे झाले तर सायकल संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल, असे ते सांगतात.
पूर्वी विद्यार्थ्यांची आणि ऑफिस गोअर्सची मोठी मागणी होती, ती आता जवळजवळ निम्म्यावर आली आहे. सायकल ट्रॅक स्वच्छ, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण झाल्यास परिस्थिती सुधारू शकते. -रितेश सुराणा, सुराणा सायकल मार्ट, फडके हौद
वाहनांच्या गर्दीत सायकलस्वारांना जागाच उरलेली नाही. विक्री तब्बल ५० टक्क्यांनी उतरली आहे. संरक्षित आणि सातत्यपूर्ण सायकल लेनची तातडीने गरज आहे. - राहुल देशमुख, देशमुख बायसिकल्स, औंध
पूर्वी शाळकरी मुलांच्या सायकलींची प्रचंड मागणी होती; मात्र आता रस्त्यांवरील सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे पालकच मुलांना सायकल वापरू नको असे सांगतात. याचा थेट परिणाम विक्रीवर होत आहे. किमान शाळांच्या परिसरात तरी सुरक्षित सायकल मार्ग विकसित करणे गरजेचे आहे. -स्मिता पवार – पवार सायकल डिपो, पिंपरी
वाहनांचा वाढता ताण आणि प्रदूषण यांमुळे सायकल चालवणे लोकांना अवघड वाटते. वाहतुकीच्या कोंडीतून सुटण्यासाठी सायकल उपयुक्त आहे; मात्र त्यासाठी रस्ते सुरक्षित हवेत. - अमोल वाघ, वाघ स्पोर्टस अँड सायकल्स, वाकड
प्रशासनाने सायकल ट्रॅकची दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे आणि जनजागृती मोहीम राबवली तर सायकलींची मागणी पुन्हा वाढू शकते. - निखिल साळुंखे, साळुंखे सायकल गॅलरी, कर्वेनगर.