कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:44 IST2025-05-30T10:42:58+5:302025-05-30T10:44:24+5:30

- डिस्टिलेशन प्लांट कुरकुंभकरांसाठी ठरतायेत जीवघेणे; गावकारभाऱ्यांच्या झाडाझडतीत उद्योजकांची पोलखोल  

pune chemicals everywhere in the Kurkumbh area chemicals Entrepreneurs exposed in the midst of the village workers struggle | कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..!

कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल...केमिकल...आणि फक्त केमिकलच..!

- रिजवान मुलाणी

कुरकुंभ :
औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून उभा केलेल्या उद्योगांनी कुरकुंभ परिसरात मोठ्या आर्थिक घडामोडींची पायाभरणी केली. मात्र, यामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांनी परिसरातील नागरिकांचेच जगणे मुश्कील करून टाकले आहे. रासायनिक कंपन्यांच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्याने आपला उच्चांक गाठला असून पावसाळ्याच्या दिवसांत कुरकुंभ परिसरात सर्वत्र केमिकल..., केमिकल आणि फक्त केमिकलच आढळून येत आहे.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीनंतर हळूहळू या परिसरात रासायनिक कंपन्यांचे प्रमाण व परिसरातील नागरीकरण वाढू लागले. औद्योगिक परिसर व लोकवस्ती यामधील दरी पूर्णतः संपून गेली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कंपन्यांच्या अगदी जवळच लोकवस्ती वाढू लागली, तसेच औद्योगिक क्षेत्रात छोट्या व्यावसायिकांनी देखील आपली घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरूच ठेवली. मात्र, या सर्व घटनांतून औद्योगिक सुरक्षा, तसेच रासायनिक सांडपाण्याचे प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करू लागले.

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनातून उत्सर्जित होणारा प्राणघातक वायू व रासायनिक घातक सांडपाणी हे उघड्यावर सोडून देण्यात आल्याने याचा प्रादुर्भाव लोकवस्तीत दिसून येत आहे. सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या अनेक स्मॉल स्केल (छोट्या उद्योगांकडे) घातक रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरक यंत्रणा नसल्याने उद्योजक हे घातक पाणी उघड्यावर किंवा कंपनीच्या आतमधील एखाद्या भागात सोडून देतात व पावसाच्या अतिप्रमाणामुळे ते सर्व पाणी लोकवस्तीत येऊन पसरते कुरकुंभ परिसरात या सांडपाण्यामुळे लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून वारंवार तक्रार करून देखील प्रशासकीय यंत्रणेला काहीही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.

उद्योजकांची अरेरावी

औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून वापरलेली रसायने घेऊन त्याद्वारे रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळे केमिकल वेगळे करण्याच्या व्यवसायाचे सध्या पेव फुटले आहे. कुठल्याही अटी व शर्तींचे पालन न करता उद्योजक रासायनिक प्रक्रियेतून रसायन वेगळे करून उर्वरित घातक रसायने व घातक घनकचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर सोडून देत आहेत याबाबत त्यांना जाब विचारला असता अरेरावीची भाषा वापरून तुमची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे करा, असा उलट सल्ला ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देताना दिसून आले. त्यामुळे उद्योजकांची अरेरावी कशा प्रकारे वाढली आहे, हे दिसून येत आहे.

रसायनांचा अनियंत्रित साठा

कुरकुंभ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाहणी केलेल्या विविध कंपन्यांमध्ये रसायनांचा अनियंत्रित साठा आढळून आला उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त रसायनांचा साठा करून ठेवल्याने कंपनीच्या परिसरामध्ये सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले ड्रम्स आणि इतर रासायनिक पदार्थ आढळून आले. त्यामुळे एखाद्या आग लागण्याच्या घटनेत आग विझविणाऱ्या कुठल्याही यंत्रणेला आतमध्ये जाता येणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे आगीचे प्रमाण वाढून अपघाताची व्याप्ती वाढते.

Web Title: pune chemicals everywhere in the Kurkumbh area chemicals Entrepreneurs exposed in the midst of the village workers struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.