किरण शिंदे
पुणे: पुण्यात अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातून एका अल्पवयीन मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आले. पुणेपोलिसांनी या मुलीची मुंबईवरून सुटका केली आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील धनकवडी भागात घडली. याप्रकरणी, पीडित तरुणीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मध्ये म्हटल्यानुसर, १६ वर्षीय तरुणी तिच्या आईसोबत रस्त्याने जात असताना एक दुचाकीवरून आलेल्या २ तरुणांनी त्यांना अडवले. खिशात असलेलं बंदूकीसारखं काहीतरी काढलं आणि आईच्या डोक्याला लावलं. दरम्यान, त्यांनी आईसोबत असलेल्या तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून फरार झाले. हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असण्याची शक्यता आहे. आरोपी आणि तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या आरोपींपैकी एका तरुणाचे संबंधित तरुणीवर प्रेम होते असा संशय सध्या पोलिसांना आहे आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आरोपीने संबंधित तरुणीला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती मिळताच, पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आरोपी आणि संबंधित तरुणी हे खालापूर येथून पुण्याच्या दिशेने एका बस मधून येत आहे. हे समजताच पोलिसांनी खालापूर गाठले आणि तरुणीची सुटका केली. मात्र त्या तरुणाने तिथून पळ काढला. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणात यश कातूर्डे नामक तरुण आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.