Pune: बहुत मस्ती आयी हैं क्या? शाळकरी मुलांचा चाकूहल्ला; एकमेकांना पाहण्याचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:28 IST2024-02-01T11:27:43+5:302024-02-01T11:28:10+5:30
गुन्हा दाखल करण्यात आलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत....

Pune: बहुत मस्ती आयी हैं क्या? शाळकरी मुलांचा चाकूहल्ला; एकमेकांना पाहण्याचा वाद
पुणे : ‘तुझे बहुत मस्ती आयी हैं, दादागिरी करता है क्या’ अशी विचारणा करून रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एका मुलावर चाकूने वार केले. गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, खडक पोलिसांनी चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले. याबाबत अल्पवयीन मुलाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत.
मुलांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. तक्रारदार अल्पवयीन मुलाचे एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलाशी दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली. मंगळवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळकरी मुलगा रामोशी गेट परिसरातून निघाला होता. त्यावेळी चाैघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ करून त्याच्या छातीवर चाकूने वार केले. गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला भररस्त्यात मारहाण केली. नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट पोलिस चौकीतील उपनिरीक्षक अश्विनी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
जखमी झालेल्या शाळकरी मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल केलेली मुले अल्पवयीन आहेत. त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.