बारामतीतील मुलींना मिळणार कर्करोगावरील मोफत लस; अजित पवार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 10:41 IST2025-03-29T10:41:01+5:302025-03-29T10:41:09+5:30
बारामती शहर, तसेच तालुक्यातील संबंधित वयोगटातील मुलींना हे लसीकरण मोफत करण्यात येईल.

बारामतीतील मुलींना मिळणार कर्करोगावरील मोफत लस; अजित पवार यांची घोषणा
बारामती : बारामती तालुक्यातील ८ ते १५ वयोगटातील मुलींना कर्करोगावरील मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती येथे आयोजित एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी पवार म्हणाले, नुकतीच अदर पुनावाला यांची भेट झाली होती.
यावेळी पुनावाला यांनी महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगावरील लस विकसित केल्याचे सांगितले. ८ ते १५ वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येते. एका लसीसाठी २ हजार रुपये खर्च येतो. बारामती शहर, तसेच तालुक्यातील संबंधित वयोगटातील मुलींना हे लसीकरण मोफत करण्यात येईल. राज्य आणि देशपातळीवर याबाबत निर्णय होईल त्यावेळी होईल. मात्र, बारामतीत त्या वयोगटातील मुलींना मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व मुलींना एकत्रित करून लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्याची सूचना यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरावेत
शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे भरावेत. परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, आता ती परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षी आणि पुढील वर्षीदेखील घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, मी राज्याचे ११ अर्थसंकल्प सादर केले आहेत. यंदा ७ लाख २० कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली आहे, तसेच साडेतीन लाख कोटी रुपये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व स्टाफचा पगार, पेन्शन तसेच घेतलेल्या कर्जाचे व्याज ४ लाख १५ हजार कोटी यासाठीच जातात. राहिलेल्या पैशातून शाळा, गणवेश, पुस्तके, हॉस्टेल, रस्ते, लाइट, पाणी, मूलभूत गरजा व इतर खर्चासह इतर अनेक प्रकारच्या खर्चाला द्यावे लागतात. त्यामुळे पीक कर्जाबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ, सध्या ती परिस्थिती नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.