Pune airport : पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:16 IST2026-02-09T15:15:54+5:302026-02-09T15:16:19+5:30
यापूर्वी थेट धावपट्टी, विमानांचे पार्किंग क्षेत्र आणि प्रवाशांचा वावर असलेल्या ठिकाणीही भटकी कुत्री आढळून आली आहेत.

Pune airport : पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक आणि कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात विमानतळाच्या बाहेर पडणाऱ्या गेटवर मोकाट कुत्रे बिनधास्त फिरत आहेत. यामुळे विमानप्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवीन टर्मिनल झाल्यावर पुण्यातून ये-जा करणाऱ्या विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. यापूर्वी थेट धावपट्टी, विमानांचे पार्किंग क्षेत्र आणि प्रवाशांचा वावर असलेल्या ठिकाणीही भटकी कुत्री आढळून आली आहेत. आता विमानतळाच्या आगमन गेटजवळ, पार्किंग परिसरात तसेच टॅक्सी-ऑटो थांब्यांजवळ मोकाट कुत्र्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. अचानक भुंकणे, प्रवाशांच्या दिशेने धाव घेणे किंवा वाहनांच्या मधे फिरणे या प्रकारांमुळे प्रवासी वैतागले आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि परदेशी प्रवासी यांना त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळ परिसरात ‘सीआयएसएफ’ची जवान, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश-नियंत्रण व्यवस्था असतानाही मोकाट कुत्रे या परिसरात कसे शिरतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
#Puneairport : पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षा की दिखाऊ व्यवस्था? मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक आणि कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात विमानतळाच्या बाहेर पडणाऱ्या गेटवर… pic.twitter.com/Oej6tJbC9H
— Lokmat (@lokmat) February 9, 2026
विमानतळासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी अशी ढिसाळ व्यवस्था असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळेत प्रवासीसंख्या कमी असताना कुत्र्यांचा वावर अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकटे प्रवास करणारे प्रवासी किंवा कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. याबाबत काही प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केले आहेत. तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सुरक्षिततेसाठी विमानतळ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महापालिकेच्या सहकार्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
विमानतळ प्रशासन करतेय काय?
- सुरक्षा कडक असताना विमानतळ परिसरात मोकाट कुत्रे कसे प्रवेश करतात?
- प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?
- महापालिका व विमानतळ प्रशासनात समन्वयाचा अभाव?
- एखादी दुर्घटना घडल्यावरच उपाययोजना होणार का?