प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:13 IST2025-11-08T11:12:41+5:302025-11-08T11:13:22+5:30
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज दोनशेहून अधिक विमानांची ये-जा असते. त्यामध्ये सर्वाधिक विमाने दिल्ली शहरासाठी उड्डाण करतात.

प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर
पुणे : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रक प्रणाली (एटीसी)मध्ये शुक्रवारी सकाळी बिघाड झाले होते. त्याचा फटका पुण्यातून दिल्लीसह इतर शहराला उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला. त्यामुळे दिवसभरात वीसहून अधिक विमानांना उशीर झाला. या सर्व विमानांना २० मिनिटांपासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला असून, वेळेत विमानतळावर आलेल्या प्रवाशांना विमानतळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज दोनशेहून अधिक विमानांची ये-जा असते. त्यामध्ये सर्वाधिक विमाने दिल्ली शहरासाठी उड्डाण करतात. यानंतर बंगळुरू शहराला जाणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावरील एटीसी यंत्रणेत अचानक बिघाड झाला. त्यामुळे विमान उड्डाण व आगमन माहिती मिळण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. पुण्यातून दिल्लीबरोबरच लखनऊ, वाराणसी, जोधपूर, जयपूर, चेन्नई, पटना या शहरांसाठी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला.
दिल्ली विमानतळावरून दिवसभरात ३०० पेक्षा जास्त विमानांच्या उड्डाण व आगमनाला उशीर झाला. दिल्ली विमानतळाच्या आजूबाजूला विमानांना बराच वेळ घिरट्या घालाव्या लागल्या. दिल्ली येथील विमान उड्डाणाचा फटका देशातील विविध विमानतळांना बसला असून, त्यामुळे सकाळी आठनंतर अनेक विमाने उशिराने उड्डाण करू लागली.
पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज २५ विमाने उड्डाण करतात. तर, तेवढीच विमाने पुण्यात येतात. दिल्लीतील एटीसीमधील बिघाडामुळे सकाळच्या टप्प्यात दिल्लीला जाणाऱ्या काही विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाला. तसेच, पुण्यात येणारी विमानेदेखील उशिराने दाखल झाली. यामुळे विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
प्रवाशांची गैरसोय
सुरुवातीला प्रवाशांना विमानाला उशीर का होत आहे, हे विमानतळ प्रशासनाकडून सांगितले जात नव्हते. काही विमानांमध्ये प्रवासी जाऊन बसले तरी विमान उड्डाणे होत नव्हती. सकाळच्या टप्प्यात प्रवाशांना सर्वाधिक त्रास झाला. दुपारनंतर विमान कंपन्यांकडून प्रवाशांना दिल्ली येथील घटनेची माहिती देत विमानांना उशीर होत असल्याची माहिती देण्यात आली. विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहता आले नाही. दिल्लीबरोबरच इतर शहरांमध्ये जाणाऱ्या विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाला.
दिल्ली विमानतळावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक उड्डाणांना उशीर होऊन प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे प्रवासी माहिती आणि काळजी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विमानतळावरील प्रवाशांना तसेच दुसऱ्या शहरातील परतीच्या उड्डाणाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्वरित, अचूक आणि स्पष्ट माहिती देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विमानतळ प्रशासनानेदेखील संवादात पारदर्शकता ठेवून एअरलाइन्सकडून प्राप्त माहिती आपल्या अधिकृत माध्यमांद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यास याचा प्रवाशांना मोठा फायदा होईल व गर्दीच्या व्यवस्थापनास उपयोग होईल. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ