Pune airport : ऐकावं ते नवलच..! दिल्लीतून पुण्यात यायला दोन तास; घरी पोहोचायला मात्र अडीच तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:25 IST2026-02-21T13:24:16+5:302026-02-21T13:25:08+5:30

विमानतळ परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त

pune airport Its amazing to hear It takes two hours to get from Delhi to Pune; but only two and a half hours to reach home. | Pune airport : ऐकावं ते नवलच..! दिल्लीतून पुण्यात यायला दोन तास; घरी पोहोचायला मात्र अडीच तास

Pune airport : ऐकावं ते नवलच..! दिल्लीतून पुण्यात यायला दोन तास; घरी पोहोचायला मात्र अडीच तास

- अंबादास  गवंडी

पुणे : विमानाने दिल्लीहून सुमारे १५०० किलाेमीटरचे अंतर पार करून पुण्यात अवघ्या दोन तासांत प्रवासी पोहोचतो; परंतु विमानतळावरून पंधरा ते वीस किलाेमीटर अंतर पार करून कात्रजला पाेहाेचण्यासाठी मात्र तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत आहे. विमानतळावर वेळेवर कॅब मिळाली तरी विमानतळ परिसर आणि रस्त्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना फटका बसत आहे. यात विमान प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. कधीकधी वाहतूक कोंडीमुळे वेळेत पाेहोचू न शकल्याने नियोजित विमानदेखील चुकते आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज सुमारे २०० विमानांची ये-जा सुरू असते. यातून जवळपास ३५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. नवीन टर्मिनल झाल्यावर प्रवासी संख्या वाढत आहे. विमानतळावरून येण्यासाठी प्रवाशांना ‘एअरोमॉल’ येथूनच कॅब पकडावी लागते. शिवाय विमानतळावर उतरल्यावर व्हॅन भरल्याशिवाय ‘एअरोमॉल’कडे येत नाही. त्यामुळे येथे येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो. दरम्यान, कॅब पकडण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. यावेळी प्रवाशांच्या गर्दीमुळे लिफ्टमधून जाताना दहा ते पंधरा मिनिटे लागतात. त्यानंतर बुक केलेली कॅब पकडल्यानंतर बाहेर येताना वेळ जातो. शिवाय मुख्य रस्त्यावर आल्यावर दिवसरात्र वाहतूक कोंडी असते. त्यामुळे निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागतो.

------

रात्रीच्या वेळी खुलेआम लूटमार :

विमानतळावरून सर्वाधिक विमाने रात्री १० ते १२ दरम्यान उड्डाण करतात. त्यामुळे रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रात्री आणि पहाटे कॅबची उपलब्धता कमी असते. त्यामुळे बऱ्याचदा कॅब उपलब्ध नसल्याचा मेसेज प्रवाशांना येतो. कॅबची मागणी वाढल्याचे दाखवून कॅबचालकांकडून जादा दर आकारले जातात. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. काही वेळा ५०० रुपयांच्या प्रवासासाठी एक हजार ते दीड हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागते. याकडे कोणाचेही लक्ष नाही; परंतु प्रवाशांना अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न केला जात आहे.

------

या आहेत समस्या...

- रिक्षा, कॅब एकाच ठिकाणी असल्याने वाहतूक कोंडी होते.

- रात्रीच्या वेळी जवळचे बुकिंग घेण्यासाठी कॅबचालकांचा नकार.

- बसण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहाने मुले यांना उभे राहावे लागते.

- कॅबची सेवा एकाच मजल्यावर असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

- बाहेरील कॅबचालकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात.

- कॅब बुक केल्यावर किमान ३० मिनिटे वाट पाहावी लागते.

विमानतळ प्रशासन लक्ष देणार का?

शहरातील कॅबचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसून, उघडउघड प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. पुणे विमानतळावरून काहीवेळा रात्रीच्या वेळी दुप्पट, तिप्पट दर आकारले जाते. शिवाय जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वीकारलेली बुकिंग कॅबचालकांकडून रद्द करण्यात येते. काहीवेळा मारामारीदेखील होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लूटमार थांबविण्यासाठी विमानतळ प्रशासन काही हालचाल करणार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 दोन दिवसांपूर्वी विमानतळावर उतरल्यावर ‘एरोमॉल’मधून कॅब पकडली. बाहेर पडायला अर्धा तास वेळ गेला. त्यानंतर रस्त्यामध्ये वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ गेला. दिल्लीहून मी दोन तासांत पुण्यात आलो; परंतु मला १८ किलोमीटरचा प्रवास करून घरी पोहोचण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ गेला.  - सागर गरड, प्रवासी

Web Title : पुणे हवाई अड्डा: तेज़ उड़ान, लंबा ज़मीनी सफ़र, यात्री परेशान

Web Summary : पुणे हवाई अड्डे पर यात्रियों को देरी और बढ़े हुए किराए का सामना करना पड़ता है। हवाई अड्डे से घर पहुँचना उड़ान से ज़्यादा समय ले सकता है, जिसका कारण है यातायात और कैब की उपलब्धता की समस्या। यात्री कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Pune Airport: Quick Flight, Long Ground Trip, Passenger Woes

Web Summary : Passengers face long delays and inflated fares at Pune Airport. Getting home from the airport can take longer than the flight itself due to traffic congestion and cab availability issues. Passengers are demanding action.