Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:50 IST2025-05-03T16:48:09+5:302025-05-03T16:50:19+5:30
Mercedes Hits Bikes In Pune: पुण्यात दारुच्या नशेत मर्सिडीज चालकाने दुचाकीस्वारला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
बंगळुरू-पुणे महामार्गावर वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ आज (०३ मे २०२५) पहाटे भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वारला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
कुणाल हुशार (वय, २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बीसीएचा विद्यार्थी होता. कुणाल हा रात्री धनकवडी येथील श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठात कीर्तन ऐकायला गेला होता. कीर्तन ऐकून घरी परतत असताना बेंगळुरू-पुणे महामार्गावर वडगाव पुलावरील विशाल हॉटेलजवळ एका भरधाव मर्सिडीजने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कुणाल जागीच ठार झाला. तर, दुचाकीच्या मागे बसलेला प्रज्योत पुजारी (वय, २१) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे शहर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले (वय, २७) असे मर्सिडीज चालकाचे नाव आहे. तर, निखिल रानवडे (वय, २६), श्रेयस सोलंखी (वय, २५) आणि वेदांत राजपूत (वय, २८) असे कारमध्ये असलेल्या इतर तिघांची नावे आहेत. हे चौघेही दारूच्या नशेत असून त्यांनी प्रथम हिंजवडीत दारु प्यायली आणि नंतर कात्रज येथे गेले. भारतीय न्याय संहिताच्या कलम १०५ अंतर्गत सध्या एफआयआर नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.