जावयाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 08:50 IST2019-05-20T08:48:59+5:302019-05-20T08:50:04+5:30
माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका नवरदेवासह सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावयाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
पिंपरी : माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका नवरदेवासह सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणा समाधान शिंदे, सचिन शिंदे, सासू दुर्गाबाई शिंदे (सर्व रा. चाकण), साडू महेश लोखंडे, साडुचा मुलगा गणेश लोखंडे (रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद मुत्तान्ना लोखंडे (वय २७, रा. वैद वस्ती, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. तर सुरेश लोखंडे असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश यांची पत्नी छाया लोखंडे या त्यांच्या तीन मुलांसह चाकण येथे माहेरी राहतात. सुरेश हे पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.
दरम्यान, रविवारी (१९ एप्रिल) सुरेश यांच्या साडुचा मुलगा गणेश याचा चाकण येथे विवाहाचा कार्यक्रम होता. या विवाह समारंभासाठी गणेश याच्या घरी सर्व पाहुणे आले होते. त्यामध्ये सुरेश यांची पत्नी आणि मुलेही आले होते. पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सुरेश बुधवारी गणेश याच्या घरी गेले. पत्नी छाया हिने सुरेश यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले नाही. तसेच आरोपींनी सुरेश यांना मारहाण केली. ‘आमच्या घरी लग्न आहे’ तुमच्यामुळे लग्न कार्यात अडथळा नको. लग्नानंतर आम्ही तुम्हाला बघून घेवू’ अशी धमकी आरोपींनी सुरेश यांना दिली. त्यावेळी ‘आपण आपले भांडण घरात बसून मिटवू पाहुण्यांसमोर गोंधळ नको’ असे सुरेश यांनी सांगितले. त्यावर ‘तु तिकडे मरुन जा, आमच्या लग्नात येवू नको, आणि मुलांनाही भेटू नको’ असे आरोपी सुरेश यांना म्हणाले. या नैराश्यातून सुरेश यांनी त्यांच्या पिंपळे गुरव, वैद वस्ती येथील राहत्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.