पुणे : मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बैठकीत घुसून त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महापालिका अधिकारी व कर्मचारी आज, गुरुवारी (दि. ७) सकाळी काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सेवा सुरळीत राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. फक्त या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेसमोर आम्ही एकत्र आलो आहोत.
पुणे महापालिकेत काल चांगलाच गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले आणि त्यानंतर मनसे नेते किशोर शिंदे व मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी आयुक्तांनी थेट, "तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड आहात," असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांना धारेवर धरले. या वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं.
मनसेच्या आंदोलकांना पोलिसांनी उचलले...
मनसे पदाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या वादावादीनंतर वाद मिटविण्याचे प्रयत्न दोन ते अडीच तास सुरू होते. मनसे नेते बाबू वागसकर यांनी आयुक्तांच्या सोबत चर्चा केली. या चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे पोलिसांना शेवटी आठच्या सुमारास शिंदे यांच्यासह मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर व इतर नेते व कार्यकर्त्यांना उचलून बळजबरीने पोलिस व्हॅनमध्ये बसविले. त्यावेळी पोलिसांच्या व्हॅनसमोरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत ती रोखण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
महापालिका आयुक्तांच्या दालनाता निवेदन देण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी गोंधळ घातला. मनसेचे कार्यकर्ते महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी तक्रार देण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद देण्याचे काम सुरू होते. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी (भारतीय न्यायसंहिता १३२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.