केंद्र सरकारचा निषेध! देशातील दडपशाहीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा मूक सत्याग्रह
By राजू इनामदार | Updated: December 19, 2024 18:40 IST2024-12-19T18:40:31+5:302024-12-19T18:40:53+5:30
आम्ही जनतेच्या वतीने या सर्व गोष्टींचा मूक निषेध करत आहोत व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत

केंद्र सरकारचा निषेध! देशातील दडपशाहीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा मूक सत्याग्रह
पुणे : देशात दडपशाही सुरू असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक सत्याग्रह करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, किशोर कांबळे, स्वाती पोकळे, शेखर धावडे, नरेश पगडालू, फाईम शेख, श्रद्धा जाधव, दीपक कामठे, अजिंक्य पालकर, कणव चव्हाण, गौरव जाधव, आशाताई साने, अनिता पवार, अर्जुन गानजे, सारिका पारेख, मयूर गायकवाड, लखन वाघमारे आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारचा निषेध करणारे फलक सर्वांनी हातात धरले होते. कोणत्याही घोषणा न देता पुतळ्यासमोर सर्वांनी शांत बसून मूक आंदोलन केले.
याप्रसंगी जगताप म्हणाले, परभणीत देशाच्या घटनाशिल्पाची झालेली विटंबना, आंबेडकरी जनतेवर झालेले अत्याचार, आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांची लाठीमार करून करण्यात आलेली हत्या, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या व या सगळ्यावर कळस म्हणून केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अनुद्गार, हे सगळे प्रकार केंद्र सरकार विशिष्ट हेतूने राज्य कारभार करत असल्याचे निदर्शक आहे. आम्ही जनतेच्या वतीने या सर्व गोष्टींचा मूक निषेध करत आहोत व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत.