पुणे : बैठा सत्याग्रह केल्यानंतरही लक्ष्मी रस्त्यावरील पथविक्रेत्यांचा प्रश्न कायम आहे. पोलिसांनी गणेशोत्सव काळात त्यांना व्यवसाय करण्यावर बंदी घातल्याने त्यांचा उत्पन्नाचा मार्गच खुणावत आहे. उत्सवाच्या दिवसांत उधारीवर आणलेल्या मालाचे पैसे देण्यास समस्या निर्माण झाली आहे.
दरवर्षी उत्सव काळात या विक्रेत्यांना दिवसा दुपारी चार वाजेपर्यंत पोलिसांकडून व्यवसायाची परवानगी दिली जाते. त्यानंतर गर्दी इतकी वाढते की त्यांना व्यवसाय बंद करावा लागतो. सायंकाळी ५ नंतर बहुसंख्य विक्रेते गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांशी सहकार्य करतात. शिवराय पथारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी सर्व विक्रेत्यांना घेऊन पोलिसांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. निषेध मोर्चा काढण्याची परवानगीही नाकारण्यात आली.
त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी बैठा सत्याग्रह केला. त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांना फरासखाना मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेले, पण अधिकारी तेथे नसल्यामुळे चर्चा झाली नाही. माळवदकर म्हणाले, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. म्हणून सायंकाळी ५ नंतर आमचा सत्याग्रह थांबवणार आहोत. मात्र उद्या सकाळपासून तो पुन्हा सुरू करू. दरवर्षीप्रमाणे आम्हाला लक्ष्मी रस्त्यावर सायंकाळी ५ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. नंतर आम्ही स्वतःच व्यवसाय थांबवू. एवढी साधी मागणीही पोलिस अधिकारी मान्य करण्यास तयार नाहीत. उलट आम्हाला अत्यंत अवमानकारक वागणूक दिली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या या अरेरावीचा निषेध करण्यासाठी सत्याग्रहाचा आमचा निर्णय कायम आहे.