'सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध', पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:58 IST2022-03-24T13:57:56+5:302022-03-24T13:58:04+5:30
केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

'सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध', पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. तसेच "मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल", "मोदी सरकार हाय हाय" , "सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, २०१४ साली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला. त्यावेळेस ३००/- रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल १०००/- रुपयांवर गेला आहे. पेट्रोल,डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची सामान्यांची लुटमार ही सुरूच आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ
निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा" असे आवाहन जगताप यांनी या आंदोलनप्रसंगी केले.