Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सात तरुणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 10:18 IST2024-04-05T10:18:11+5:302024-04-05T10:18:31+5:30
सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये चार थायलंड आणि तीन तरुणी मेघालय, छत्तीसगड येथील आहेत...

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सात तरुणींची सुटका
पुणे : काेरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ‘एल स्पा’ सेंटरवर छापा टाकून कारवाई करत, ७ तरुणींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये चार थायलंड आणि तीन तरुणी मेघालय, छत्तीसगड येथील आहेत.
स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (३२, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) आणि मॅनेजर शाहरुख अहमद चाैधरी (२७, रा. जाधवनगर मुंढवा, मु. रा. जुगिजान, ता. जि. हुजाई, आसाम) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पाेलिस हवालदार रेश्मा कंक यांनी काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एला स्पा’ आहे. यामध्ये भारतीय आणि परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवण्यात आला. ग्राहकाने या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये थायलंडच्या चार तरुणींचा समावेश आहे. तर, मिझोरामच्या दोन तरुणी आणि छत्तीसगढच्या एका तरुणीसह एकूण सात जणींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये साडेचार हजारांची रोकड, तीन मोबाइल व अन्य साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणाचा पुढील तपास काेरेगाव पार्क पोलिस करत आहेत.