Pune Crime: अट्टल गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, वर्षातील ६९ वी स्थानबध्दतेची कारवाई
By नितीश गोवंडे | Updated: December 14, 2023 14:30 IST2023-12-14T14:29:51+5:302023-12-14T14:30:18+5:30
वर्षभरात पोलीस आयुक्तांची ही ६९ वी कारवाई आहे...

Pune Crime: अट्टल गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, वर्षातील ६९ वी स्थानबध्दतेची कारवाई
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सागर संदिप शर्मा उर्फ भोवते (२०, रा. लेक टाऊन जवळ, भारती विद्यापीठ) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. वर्षभरात पोलीस आयुक्तांची ही ६९ वी कारवाई आहे.
सागर शर्मा उर्फ भोवते हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार यासारख्या हत्यारांसह जबरी चोरी, पळवून नेणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार करत नव्हते.
सागर शर्मा याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन आयुक्तांनी सागर शर्मा याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखा, पीसीबी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.