खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:39 IST2025-02-06T13:38:49+5:302025-02-06T13:39:24+5:30
नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली

खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस
- अंबादास गवंडी
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ७१४ खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. यामध्ये तब्बल ७६ टक्के रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाने महिनाभरात सुमारे ७१४ रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ७६ रुग्णालयांनी नियमांचे पालन न केल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी झाली आहे का, याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयाकडील अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दल माहिती घेतली जात आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी दिली.
सुधारणेसाठी महिन्याचा कालावधी
नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. एक महिना पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून नोटीस पाठवलेल्या रुग्णालयांची पुन्हा तपासणी करून सुधारणा झाल्याची खात्री केली जाणार आहे. रुग्णालयांनी सुधारणा केली नसल्यास त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाऊल आरोग्य विभाग उचलणार आहे.
खासगी रुग्णालयांची तपासणी
एकूण खासगी रुग्णालये - ८४९
तपासणी झालेली रुग्णालये - ७१४
नोटीस पाठवलेली रुग्णालये - ७६
महापालिकेककडून खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू असून, उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, रुग्ण हक्क संहिता नसणे यासह इतर नियमांचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले. याप्रकरणी ७६ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. - डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका