Pune Crime: येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार
By विवेक भुसे | Updated: November 21, 2023 12:02 IST2023-11-21T11:58:18+5:302023-11-21T12:02:27+5:30
याबाबत तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे....

Pune Crime: येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार
पुणे : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा कारागृहातून पळून गेल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. आशिष भारत जाधव (मुळ रा. अष्टगंधा सोसायटी, ता. मावळ) असे या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २००८ मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात आशिष जाधव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याची वर्तवणुक चांगली वाटल्याने त्याला कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सर्व कैद्यांची गणती करण्यात आली. त्यावेळी आशिष जाधव हा बरॅकमध्ये आढळून आला नाही.
कारागृहात शोध घेतला असताना कोठेही मिळाला नाही. त्यामुळे तो पळून गेल्याचे लक्षात आले. जाधव कधी कसा पळून गेला, याची काहीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.