पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब ! येत्या शनिवारी 'सिरम'ला देणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 19:40 IST2020-11-26T14:33:34+5:302020-11-26T19:40:40+5:30
मोदी यांच्या पुणे दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू..

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब ! येत्या शनिवारी 'सिरम'ला देणार भेट
पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील " सीरम इन्स्टिट्यूट " कडे लागले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (दि.28) रोजी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसची निर्मिती आणि वितरणाची तयारी याचा आढावा घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना दिली.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जगात अनेक देशांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू असून, अनेकांनी आपली लस अंतिम टप्प्यात आल्याचे जाहीर देखील केले आहे.
यामध्ये भारताने आघाडी घेतली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या लसीकडे संपूर्ण जगाचे लाक्ष आहे. यासाठीच तब्बल शंभर देशांचे राजदूत व संबंधित अधिकारी 4 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देऊन लसी संदर्भात माहिती घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजदूत येण्यापूर्वी स्वत: मोदी पुण्यात येऊन सीरम मध्ये आढाव घेणार आहेत.
याबाबत राव यांनी सांगितले, गुरूवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौ-या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत पत्र आले. परंतू त्यापूर्वीच पंतप्रधान दौऱ्याची सर्व तयारी सुरू होती. दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान गुरूवारी (दि.26) रोजी दाखल झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान दौऱ्यात विषेश खबरदारी घेण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले. याच शिवाय शंभर राजदूत यांच्या दौऱ्याची देखील तयारी सुरू असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
-------
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा
- दुपारी 12.30 वाजता लोहगाव येथील टेक्निकल एअरपोर्ट आगमन
- लोहगाव येथून स्पेशल हेलिकॉप्टरने सीरम येथे आगमन
- दुपारी 1 ते 2 या एक तासात सीरम येथे आढावा
- दुपारी 2 वाजता सीरम येथून हेलिकॉप्टरने लोहगावा
- लोहगाव येथून हैद्राबादकडे रवाना