‘लोकसभा’ काळात बारामतीत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:26 IST2022-09-06T16:24:54+5:302022-09-06T16:26:36+5:30
बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड हा कोणत्याही परीस्थितीत ढासळणारच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मोठी सभा ...

‘लोकसभा’ काळात बारामतीत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
बारामती: लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड हा कोणत्याही परीस्थितीत ढासळणारच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मोठी सभा बारामतीत होणार आहे. आजपासूनच भाजप कार्यकर्त्यांनी घरात मत परीवर्तनासाठी कामाला लागावे. बारामतीत आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला विसर्जित करुन त्यांच्या नेत्यांचा घमंड नेस्तनाबूत करा. चांद्यापासून बांद्यापर्यंत या पराभवाचा संदेश गेल्यास पुर्ण राज्यातच ‘राष्ट्रवादी’चे विसर्जन होईल,अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या.
बारामती येथे लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बावनकुळे पुढे म्हणाले, बारामतीचा पुढचा खासदार हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या असली शिवसेना युतीचा असेल. हिंदुत्ववादी शिवसेना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नको आहे, त्यांना राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चालणारी शिवसेना हवी आहे. मात्र, शिंदे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर भाजप आगामी निवडणुका लढवून क्रमांक एकचा पक्ष होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
परिसरात काही साखर कारखान्यांच्या निवडणुका आठ-आठ वर्षे होत नाहीत. बोगस मतदान करुन, दुध संघ, कारखाने ताब्यात ठेवले आहेत. कोणाचे ऑडीट नाही, गरीबांवर अन्याय करण्याचे काम सुरु आहे. जेवढे नागपुरवर लक्ष तेवढेच बारामतीवर लक्ष देणार, त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, असे बावनकुळे म्हणाले.
बारामती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सांगतात. ४० वर्ष तुम्ही सत्तेत होता. येथील जनतेने मते दिल्याने निवडून आला. त्यामुळे मतांच्या बदल्यात विकासकामे करण्याचे कर्तव्यच आहे,विकासकामे केली म्हणजे उपकार केले का, असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला.
....बारामतीत उदघाटनासाठी नितीन गडकरी यांना आणणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केलेल्या कामांचे श्रेय घेवून फलक लावण्याचे प्रकार सुरु आहेत. आमच्या सरकारने केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नका. त्यासाठी बारामतीच्या कामांचे उदघाटन करण्यास गडकरी यांनाच आणणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.