भासवले कलेक्टर, निघाला तोतया! पत्रकाराला गंडा, ‘शाहरुख’ला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 14:13 IST2023-10-07T14:13:15+5:302023-10-07T14:13:33+5:30
सायबर चोरट्याला राजस्थान येथून केली अटक...

भासवले कलेक्टर, निघाला तोतया! पत्रकाराला गंडा, ‘शाहरुख’ला बेड्या
पुणे : जुने फर्निचर स्वस्तात विकायचे असून, आपण पुणे जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करत एका पत्रकाराची ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. शाहरूख काटूला खान (२३, रा. अलवर, राजस्थान) असे या सायबर भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी खान बरोबरच सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका ३९ वर्षीय पत्रकाराने सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. सोशल मीडियाद्वारे तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी आरोपी खानने तक्रारदाराकडे केली होती. माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात नियुक्तीस आहे. त्याला जुने फर्निचर विकायचे आहे, अशी बतावणी खानने तक्रारदाराकडे केली होती. खानने फर्निचर स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर मात्र फर्निचर पाठवले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, नीलेश लांडगे, शाहरुख शेख आदींनी तपास करून खानला राजस्थानातील अलवर शहरातून अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.