लोकसभेची पूर्वतयारी : पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक होणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 08:40 IST2018-11-16T08:36:59+5:302018-11-16T08:40:02+5:30
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक उद्या जाहीरपणे सादर केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेची पूर्वतयारी : पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक होणार सादर
पुणे :पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक उद्या जाहीरपणे सादर केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात भाजपने लोकसभेची पूर्वतयारी सुरु केल्याचे दिसत आहे.
भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आणि त्यानंतर केलेले काम याची थेट आकडेवारी ते उद्या सादर करणार आहेत. शिरोळे यांचा हा कार्यक्रम त्यांच्या राजकीय भविष्यासाठी तर महत्वाचा आहेच पण गेली साडेचार वर्ष पुण्यात भाजपने केलेल्या कामगिरीचाही आहे. त्यामुळे त्यांनी अहवालात केलेली मांडणी विरोधकांकडून कशा पद्धतीने स्वीकारली जाणार याकडेही शहराचे लक्ष लागून आहे. शांत, मवाळ म्ह्णून शिरोळे यांची शहरात ओळख आहे. शहरात शत-प्रतिशत भाजपाची सत्ता असली तरी निवडक ठिकाणीच त्यांची उपस्थिती दिसून आली आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो अशा मोठ्या प्रकल्पांची पायाभरणीही मागील चार वर्षात झाली आहे. मात्र तरीही शहरातील प्रश्नांवर त्यांनी फारसी आक्रमक भूमिका घेतलेली दिसून आलेली नाही.
अहवाल सादर करून शिरोळे पुढील निवडणुकीसाठी एकप्रकारे सज्ज असल्याचे दाखवत असले तरी त्यांचा मार्ग तेवढा सुकर नाही. भाजपमध्येच अनेकांना खासदारकीची स्वप्नं पडली असून त्यांनीही दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यातच नगरसेवक मुलगा सिद्धार्थ वगळता शिरोळे यांचा स्वतःचा असा गटही नाही. त्यामुळे पुढील लोकसभेची संधी पक्ष त्यांना देणार का आणि यासाठी आजच्या प्रगतीपुस्तकाचा किती फायदा होईल हे बघण्यासाठी काही महिने वाट बघावी लागणार आहे.