ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलीस कोठडी संपल्यानंतर आज प्रांजल केवलकर यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.. दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या विषयी आणखी नवीन माहिती पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवली..
प्रांजल खेवलकर आणि आरोपी तरुणी प्राची शर्मा यांनी अनेकदा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये एकत्र पार्टी केल्याचे समोर आले आहे. पुण्यातीलच हॉटेल वॉटर, डिमोरा या ठिकाणी या दोघांनी एकत्र दारू आणि हुक्का पार्टी केल्यात. शिवाय लोणावळा या ठिकाणी खेवलकर पार्टी करत असताना तिथे प्राची शर्माही देखील उपस्थित होती. याशिवाय या दोघांचे इंस्टाग्राम चॅटिंगही असल्याचे पोलिसांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.
प्रांजल खेवलकर हे स्टेबर्ड हॉटेलमध्ये रूम बुक करून वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणी सोबत अनेकदा पार्टी करीत असल्याचं समोर आले आहे. २०२४ आणि २०२५ या दोन वर्षाच्या काळात त्यांनी तब्बल वीस वेळा या ठिकाणी रूम बुक केली होती. तर ४३ दिवस त्याने या ठिकाणी मुक्काम केला. २५ जुलैच्या रात्री देखील खेवलकर दोन वेगवेगळ्या मुलींना घेऊन याच हॉटेलमध्ये आला होता. रात्री ११ ते पहाटे ४:५० पर्यंत त्यांनी या ठिकाणी दारू आणि हुक्का पार्टी केल्याचे तपासात समोर आले आहे.
याशिवाय आरोपी प्रांजल खेवलकर, निखिल पोपटानी, आणि श्रीपाद यादव हे सराईतपणे वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसोबत दारू आणि हुक्का पार्टी करीत असल्याचे समोर आले आहे. पुणे, लोणावळा, गोवा, साकीनाका या शहरात त्यांनी वेगवेगळ्या महिला आणि मुलींसोबत जाऊन मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या केल्याचेही समोर आले आहे.
प्रांजल खेवलकर याच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून वेगवेगळ्या महिलांसोबतचे पार्टीमधील व पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्याचे अनेक अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनीय व्हिडिओ, फोटो मिळाले आहेत. हे फोटो व्हिडिओ त्याने गैरकृत्य करण्याच्या दृष्टीने काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.. या व्हिडिओच संख्या जास्त असल्याने सखोल तपास करण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.