Pune | पोस्टमास्तरांनीच केली हेराफेरी, दुसऱ्या शाखेत ठेवी दाखवून लाटले लाखो रुपयांचे कमिशन

By विवेक भुसे | Updated: March 25, 2023 15:15 IST2023-03-25T15:14:44+5:302023-03-25T15:15:53+5:30

पोस्टमास्तरांनी इतरांना हाताशी धरुन पैशांची हेराफेरी केली...

postmasters of the postal department did the manipulation, showed the deposits in the other branch and got a commission of lakhs of rupees | Pune | पोस्टमास्तरांनीच केली हेराफेरी, दुसऱ्या शाखेत ठेवी दाखवून लाटले लाखो रुपयांचे कमिशन

Pune | पोस्टमास्तरांनीच केली हेराफेरी, दुसऱ्या शाखेत ठेवी दाखवून लाटले लाखो रुपयांचे कमिशन

पुणे : टपाल कार्यालयामध्ये आलेल्या गुंतवणुकदारांनी केलेली गुंतवणुक ही शाखा कार्यालयात केलेली आहे, असे दर्शवून त्यावर परस्पर कमिशन घेऊन तब्बल २३ लाख ७६ हजार २१५ रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमास्तरांनी इतरांना हाताशी धरुन ही हेराफेरी केली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. योगेश् नानासाहेब वीर (वय ४२, रा. खडकमाळ आळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी उपडाकघरचे पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी (वय ४०, रा. येवलेवाडी), क्लार्क भगवान श्रीरंग नाईक (वय ३६, रा. दिघी), धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे (वय ३७, रा. धानोरी), धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय ४९,रा. भैरवनगर, धानोरी), रमेश गुलाब भोसले (रा. वानवडी), विलास एस देठे (वय ५९,रा. वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट खात्याच्या नियमानुसार डाकघरात ग्राहक थेट गुंतवणुक करायला आले तर त्यावर पोस्टमास्तरला कमिशन मिळत नाही. मात्र, त्या डाकघराच्या अंतर्गत इतर डाकघर असतील तेथे गुंतवणुक करण्यात आली असेल तर त्यावर तेथील पोस्ट मास्तरांना कमिशन मिळते. त्यामुळे दिघी डाक कार्यालयात आलेल्या गुंतवणुक अन्य डाकघरातून आल्या असल्याचे दाखवून त्याचे कमिशन लाटल्याचे टपाल खात्याच्या वार्षिक तपासणीत उघडकीस आले आहे.

हा प्रकार दिघी टपाल कार्यालयात १६ जुलै २०१८ ते २१ ऑगस्ट २०२० दरम्यान दिघी कार्यालयात २७४ गुंतवणुकदारांनी ९ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा डाकघर येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी १८ लाख ३५ हजार ११५ रुपये धानोरी डाकघरास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक केली.त्याप्रमाणे डंकर्क लाईनमध्ये आलेल्या ५९ गुंतवणुकदारांची एकूण २ कोटी ४७ लाख ६० हजार रुपये रक्कम स्वीकारुन त्यांचे बीआरडी डाकघरामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी ४ लाख ९५ हजार २०० रुपये स्वीकारले. त्यातील ७५ टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन २५ टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल रमेश भोसले यांना दिली.

विमाननगर येथील उपडाकघरात विलास देठे हा उपडाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवर्ती ठेवखाते आणि सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आलेल्यांच्या रक्कम स्वीकारुन त्यांच्या पासबुकवर नोंद करुन त्याची शासकीय फिनाकॅल प्रणाली मध्ये नोंद करायची जबाबदार देठे यांच्यावर होती. त्याने १९ खातेदारांनी आवर्ती ठेव खाते व सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली ४५ हजार ९०० रुपयांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये जमा न करता फसवणूक केली.

वार्षिक तपासणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टाच्या कोणत्याही ग्राहकाची तक्रार नाही. संबंधितांकडून कमिशनची रक्कम वसुल करण्यात आली आहे. मात्र, गुन्हा घडला असल्याने पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.

- शरद वांगकर, जनसंपर्क अधिकारी, भारतीय टपाल विभाग

Web Title: postmasters of the postal department did the manipulation, showed the deposits in the other branch and got a commission of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.