पंढरपूर मुक्कामात अडचणीची शक्यता

By Admin | Updated: July 3, 2015 00:24 IST2015-07-03T00:24:19+5:302015-07-03T00:24:19+5:30

श्रीक्षेत्र देहूगाव येथील पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असून, पालखी बाहेर पडताना लहान प्रवेशद्वार अडथळा ठरत आहे; तर पंढरपूर येथील श्री संत तुकाराममहाराज

Possible possibility of difficulty in Pandharpur | पंढरपूर मुक्कामात अडचणीची शक्यता

पंढरपूर मुक्कामात अडचणीची शक्यता

देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगाव येथील पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असून, पालखी बाहेर पडताना लहान प्रवेशद्वार अडथळा ठरत आहे; तर पंढरपूर येथील श्री संत तुकाराममहाराज मठात पालखीच्या मुक्कामाची जागा संबंधित संस्थेने भाडेपट्ट्याने दिल्याने पालखी मुक्कामाला या वर्षी अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेवटच्या मुक्कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने या ठिकाणांचा पालखी तळ म्हणून विकास करावा, अशी मागणी संस्थानाच्या एका पदाधिकाऱ्याने केली आहे.
पालखीसोहळा सुरू झाल्यापासून श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदारवाड्यात होतो. या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीकडे निघताना मोठी गर्दी होते. वाड्याचा दरवाजा सोहळ्यासाठी अरुंद आहे. येथे गर्दी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. याचा विचार करून पालखी तळ म्हणूनच या भागाचा विकास करावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
पंढरपूर येथील श्री संत तुकाराममहाराज मठाच्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत तुकाराममहाराजांची पालखी ४ ते ५ दिवस (तिथीप्रमाणे कमी-जास्त दिवस) येथे मुक्कामी असते. पालखी मुक्कामाची जागा एका खासगी संस्थेकडे आहे. सध्या पंढरपूर येथील जागांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने जागा विकून पैसा मिळविण्याच्या स्वार्थी हेतूने येथील संस्थेने ही जागा विकण्याचा घाट घातला होता. यासाठी काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रामध्ये जागा विकण्याबाबतची निविदा प्रसिद्ध केली होती. या नोटिशीची माहिती संस्थानाला मिळाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या निविदेप्रमाणे श्री संत तुकाराममहाराज संस्थानाने ही
जागा विकत घेण्याची तयारी
दाखवून अपेक्षित रकमची निविदा भरली. संस्थान ही जागा रोख रक्कम देऊन घेण्यास तयार असल्याचे संबंधित संस्थेच्या लक्षात आल्यानंतर केवळ संस्थानला ही जागा मिळू नये त्यासाठी निविदाप्रक्रिया रद्द ठरविली. (वार्ताहर)

Web Title: Possible possibility of difficulty in Pandharpur