कोंढव्यातील दोन फ्लॅटमधून ५४ मांजरे ताब्यात, रहिवाशांनी सुटका सुटकेचा निश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 23:41 IST2017-09-12T23:41:19+5:302017-09-12T23:41:19+5:30
मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अनिमल वेलफेअरच्या भूगाव येथील अनाथालयात ठेवण्यात येणार आहे.

कोंढव्यातील दोन फ्लॅटमधून ५४ मांजरे ताब्यात, रहिवाशांनी सुटका सुटकेचा निश्वास
पुणे, दि. 12 - मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अनिमल वेलफेअरच्या भूगाव येथील अनाथालयात ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या त्रासातून मुक्त झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला़
कोंढवा पोलिसांकडे अनिमल वेलफेअरच्या अधिकारी मेहेर मथरानी यांनी सोमवारी फिर्याद दिली़ पोलिसांनी दिपिका कपूर व संगीता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला़ त्यानंतर सोमवारी रात्री ब्रम्हा होरियन सोसायटीतील ए ३ विंगमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अॅनिमल वेलफेअरचे कार्यकर्ते व पोलीस गेले़ या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता़ याठिकाणी त्या रहात नव्हत्या़ रात्री अपरात्री येऊन या मांजरांना त्या खाणे टाकत असत़ आतमधील दृश्य अतिशय किळसवाणे होते. सर्वत्र मांजरी फिरत होत्या़ घरातील बेडशीट, चादरी, खेळणी या मांजरांनी फाडून टाकल्या होत्या़ त्यांच्या चिध्या केल्या होत्या़ मांजरीचे मलमुत्र, विष्ठा साफ न केल्याने सर्वत्र दुर्गधी पसरली होती़ त्याचा या इमारतीतील सर्वांनाच त्रास होत होता. सोमवारी रात्री या घरातून २९ मांजरींना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना भूगावला पाठविण्यात आले़
त्यानंतर मंगळवारी कपूर राहत असलेल्या ए १ विंगमधील पाचव्या मजल्यावर पोलीस व कार्यकर्ते गेले. पण, या दोन्हींना दरवाजा उघडण्यास नकार दिला. काय बोलायचे ते आमच्या वकिलांशी बोला असे त्यांचे सांगणे होते़ जवळपास तासभर पोलिसांचा प्रयत्न सुरु होता पण, त्यांनी दाद लागून दिली नाही. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पुढे करुन महापालिकेचे कर्मचारी आहोत, घराची साफसफाईची पाहणी करण्यासाठी आल्याचा बहाणा केला़ तेव्हा त्यांनी दरवाजा किलकिला केला़ त्याचा फायदा घेऊन अॅनिमल वेलफेअरचे कार्यकर्ते आत घुसले़ त्यांनी या घरातून २५ मांजरे ताब्यात घेतली़ त्यावेळी काही मांजरे पळून गेली. जवळपास तीन तास ही कारवाई सुरु होती़
या मांजरांशिवाय सोसायटीच्या आवारात आणखी २० -२५ मांजरे मोकाट फिरत असतात. या दोन्ही त्यांना खायला टाकत असत. त्यांना ती वेळ नेमकी माहिती झाल्याने त्यावेळेला ते सोसायटीत जमा होत असतात़ या मांजरांमुळे या दोन्ही विंगमधील पाचव्या मजल्यावर राहणा-या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता़ मांजरांचे केस व त्यांच्या विष्ठेमुळे घशाचा त्रास, दम्याचा त्रास होत होता़
कपूर यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून कोंढवा पोलीस व अॅनिमल वेलफेअर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल २५ मांजरे पकडली आहेत़ त्यासाठी मोठी शिकस्त करावी लागली़ अनेकदा विनंती करूनही फ्लॅटमधून येत असलेल्या दुर्गंधीचा उपाय केला जात नव्हता़ ज्या दुर्गंधीचा त्रास ए ३ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून सहन करत होते. हे रहिवासी विशेषत: लहान मुले आजारी पडत होती, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन पुनीत ओबेरॉल यांनी दिली.