उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:39 IST2025-06-17T16:38:29+5:302025-06-17T16:39:12+5:30

केंद्रांना घरघर : पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रेच सुरू; अनेक केंद्रांना टाळे लागले; अनुदान थकले, भ्रष्टाचाराचे आरोप

Poor starving in Shiv Bhojan Thali due to apathy; State government's scheme on the path of Jhunka-Bhakar | उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर

उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर

- आकाश झगडे

पिंपरी : थकलेले अनुदान, न परवडणाऱ्या दरातील पुरवठा, भ्रष्टाचाराचे आरोप, राज्य सरकारचे दुर्लक्ष यामुळे 'शिवभोजन थाळी' योजनेला घरघर लागली आहे. गरीब, गरजू, मजूर, शेतकरी, बेघर, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांना स्वस्त दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली अनेक शिक्भोजन केंद्रांना टाळे लागले असून, लक्ष न दिल्यास उर्वरितही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रेच सुरू असल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २६ जानेवारी २०२० रोजी वाजत गाजत सुरू झालेल्या शिवभोजन थाळी योजनेची महायुती सरकारच्या काळात वाताहत झाली आहे. या योजनेत लाभार्थ्यांना केवळ दहा रुपयांमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक मूद भात, असा आहार मिळण्याची व्यवस्था आहे. यासाठी सरकार शहरी भागातील केंद्रांना चाळीस रुपये तर ग्रामीण भागात पस्तीस रुपये अनुदान देते. गरजू लोक आजही या योजनेतून भूक भागवत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अनेक ठिकाणी तर शिवभोजन केंद्रावर नागरिकांची बरीच गर्दी असते. परंतु ताटांच्या ठरलेल्या संख्येमुळे अनेकदा काही गरजूंना जेवण देणे शक्य होत नाही. तर काही ठिकाणी शिवभोजन थाळीला म्हणावा तसा प्रतिसाद लाभार्थ्यांकडून मिळताना दिसत नाही.

कोविड काळात अनेकांसाठी ही योजना आधार ठरली. बचत गट, छोट्या व्यावसायिकांना यातून रोजगार मिळत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रांमध्ये वर्दळ दिसून आली. लाभार्थी नसल्याने केंद्र बंद होत असल्याचे कारण दिले जात असले तरी शहरात सुरू असणाऱ्या दोन्ही केंद्रांवर लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे. युती सरकारने सुरू केलेली झुणका-भाकर केंद्रे राजकीय उदासीनतेमुळे नामशेष होत गेली, तसे शिवभोजन केंद्रांबाबत होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

योजनेला घरघर का?

अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप इतर योजनांचा तिजोरीवर भार, त्यामुळे निधीमध्ये वाढ नाही.
सरकारकडून अनुदान थकीत महागाईच्या काळात अनुदान न परवडणारे, जेवणाची गुणवत्ता कमी अनेक ठिकाणी लाभार्थी कमी होणे महायुती सरकारकडून दुर्लक्ष
शहरात या दोन ठिकाणी मिळते शिवभोजन थाळी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी राज्य मार्ग परिवहन महामंडळ उपाहारगृह, वल्लभनगर आगार

राजकीय उदासीनता आणि योजना बंद होण्याची चर्चा

एका सरकारने आणलेल्या योजना दुसऱ्या सरकारच्या काळात बंद होतात, याची अनेक उदाहरणे आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये कोणताही भरीव आर्थिक निधी दिला गेला नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही योजना गरजू, कष्टकरी जनतेसाठी महत्त्वाची असल्याचे पटवून दिल्याने ती सुरू ठेवण्यात आली.

दुपारी १२ ते १ च्या दरम्यान सहज उपलब्ध होते जेवण

पिंपरी-चिंचवडमध्ये नवनगरविकास प्राधिकरण आकुर्डीत शिवभोजन थाळी मिळते. परंतु या भागात लाभार्थ्यांचा प्रतिसाद अधिक असल्याने अनेकदा अतिरिक्त आलेल्या लाभार्थ्यांना जेवण उपलब्ध होऊ शकत नाही. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान गेल्यासच सहज उपलब्ध होतो.

थाळीतील जेवणाची गुणवत्ता सुमार

प्रत्यक्षात केंद्रावर जाऊन थाळी खाल्ली असता इतर ठिकाणच्या तुलनेत जेवणाची गुणवत्ता सुमार होती. याबाबत केंद्रचालकाला विचारणा केली असता तुटपुंज्या अनुदानात अशीच थाळी देणे परवडते, असे उत्तर मिळाले. 

मी केंद्रावर येऊन रोज योजनेचा लाभघेत असतो. यामुळे पैशांची बचत होते. माझ्यासारख्या अनेकांचा शिवभोजन थाळी रोजचा आधार आहे. त्यामुळे सरकारने ही योजना सुरू ठेवावी. - रमाकांत जाधव, लाभार्थी
 

योजनेचा लाभकेंद्राच्या आसपास असणारे गरीब, कष्टकरी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे ती बंद केली जाऊ नये. - आकाश सुर्वे, नागरिक

लाडकी बहीण योजनेवर जसे सरकारचे विशेष प्रेम आहे, तसे याही योजनेकडे लक्ष द्यावे. या योजनेस पुनरुज्जीवन देऊन केंद्र वाढवण्यावर भार द्यावा. -  यशराज कुमार, नागरिक

Web Title: Poor starving in Shiv Bhojan Thali due to apathy; State government's scheme on the path of Jhunka-Bhakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.