विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आणि खोट्या प्रमाणपत्रांमुळे आयएसएस बडतर्फीची कारवाई झालेल्या पूजा खेडकर हिचं कुटुंब आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. पूजा खेडकर हिच्या पुण्यातील घरात चोरी झाली आहे. घरातील नोकरानेच पूजा हिला बांधून ठेवून आणि तिच्या आई-वडिलांना गुंगीचं औषध देऊन घरातील ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात चोरीचा हा धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत पूजा खेडकर हिने दिलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात कुटुंबीयांसह काही कामगार राहतात. यापैकी एक कामगार आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता. हाच कामगार या चोरीमागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित कामगाराने शनिवारी रात्री दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकर हिला बांधून ठेवले. त्यानंतर संशयित आरोपी असलेल्या या कामगाराने घरातील सर्वांचे मोबाईल फोन घेऊन पलायन केले.
त्यानंतर पूजा खेडकर हिने स्वतःची कशीबशी सुटका करून घेत चतु:श्रृंगी पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. चोरीची माहिती मिळताच चतुः शृंगी पोलिसांचे पथक तातडीने खेडकर यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी दिलीप आणि मनोरमा खेडकर हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून, कोणताही धोका नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर पूजा खेडकर यांनी फोनवरून माहिती दिली असली तरी त्यांनी अद्याप पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केलेली नाही. आपली मनस्थिती स्थिर झाल्यानंतर तक्रार देणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. मोबाईल फोन व्यतिरिक्त घरातून आणखी कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Web Summary : Pooja Khedkar's Pune home was robbed. A servant drugged her parents, tied her up, and stole valuables. Police are investigating after Khedkar freed herself and reported the incident. Her parents are hospitalized and stable.
Web Summary : पूजा खेडेकर के पुणे स्थित घर में चोरी हुई। एक नौकर ने उसके माता-पिता को नशीला पदार्थ दिया, उसे बांध दिया और कीमती सामान चुरा लिया। खेडेकर के खुद को छुड़ाकर घटना की सूचना देने के बाद पुलिस जांच कर रही है। उसके माता-पिता अस्पताल में हैं और स्थिर हैं।