पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली. या सोडतीने काही प्रभागात दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. काही प्रभागांमध्ये दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहवे लागणार आहे. आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असुन इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे प्रारूप आरक्षण सोडत आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. या आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी आणि त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढण्यात आले.
उमेदवारासाठी पक्षातंर्गतही करावा लागणार संषर्घ
काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामुळे अशा प्रभागांमध्ये अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. तर काही जणांना पुन्हा महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींसाठी ही मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये नाराजी टाळण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे.
अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला
आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. हरकती सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा पालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता येणार आहेत. पालिकेची वेबसाइट, ई-मेल किंवा ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
पुणे महापालिका एकूण जागा १६५
- अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा , १ महिला राखीव
- अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ जागा ११ महिला राखीव
- ओबीसींसाठी ४४ जागा २२ जागा महिला राखीव
- सर्वसाधारण ९७ जागा ४९ महिला राखीव