पोलिसांचे गणवेश आढळले कचरा पेटीत!; पुण्यातील दारुवाला पूल परिसरातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:46 IST2017-11-22T11:41:18+5:302017-11-22T13:46:39+5:30
पोलिसांची शान, मान असलेली वर्दी म्हणजेच गणवेश चक्क कचरा पेटीत आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दारुवाला पूल परिसरात घडली आहे.

पोलिसांचे गणवेश आढळले कचरा पेटीत!; पुण्यातील दारुवाला पूल परिसरातील धक्कादायक प्रकार
प्राजक्ता पाटोळे
पुणे : पोलिसांची शान, मान असलेली वर्दी म्हणजेच गणवेश चक्क कचरा पेटीत आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दारुवाला पूल परिसरात घडली आहे.
पुणे पोलीस दलामध्ये रोज नव्या घडामोडी घडत असून सोमवारची सकाळी तर चक्क पोलिसांचे गणवेशच कचरा पेटीत फेकून दिल्याचे आढळून आले. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर या संबंधीची माहिती देण्यासाठी त्यांनी पोलीस चौकी गाठली, पण चौकीमध्ये एकही पोलीस हजर नव्हता.
सोमवार पेठेतील दारूवाला पूल परिसरातील एका कचरा पेटीत पोलिसांचे नवीन कपडे फेकून देण्यात आल्याचे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या बाबत त्यांनी चौकशी केली, मात्र काहीही माहिती मिळू शकली नाही. जवळच्या पोलीस चौकीमध्ये जाऊन माहिती देण्याच्या प्रयत्नही केला, मात्र तेथे एकही पोलीस हजर नव्हता. त्यामुळे या कपड्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे गणवेश-कपडे पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा ताब्यात देण्यात आले आहेत.