धक्कादायक : महापालिकेकडून कारवाई; सातपूरमधील शाकुंतल सोनोग्राफी सेंटर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:01 AM2017-11-21T00:01:26+5:302017-11-21T00:04:20+5:30

फिरत्या वाहनात गर्भजल लिंग चाचणी नाशिक : सातपूर येथील एमएचबी कॉलनीतील डॉ. तुषार पाटील यांच्या वाहनामध्ये बेकायदेशीरपणे गर्भजल लिंग चाचणीसाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. पाटील यांचे शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन सील करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, महापालिकेने सदर केंद्राची नोंदणीही निलंबित केली असून, लवकरच त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.

 Shocking: action taken by municipal corporation; Shakuntal Sonography Center Seal in Satpur | धक्कादायक : महापालिकेकडून कारवाई; सातपूरमधील शाकुंतल सोनोग्राफी सेंटर सील

धक्कादायक : महापालिकेकडून कारवाई; सातपूरमधील शाकुंतल सोनोग्राफी सेंटर सील

googlenewsNext
ठळक मुद्देसातपूरमधील शाकुंतल सोनोग्राफी सेंटर सीलडॉ. तुषार पाटील यांच्या वाहनामध्ये बेकायदेशीरपणे गर्भजल लिंग चाचणीसाठी लागणारे साहित्य

फिरत्या वाहनात गर्भजल लिंग चाचणी

नाशिक : सातपूर येथील एमएचबी कॉलनीतील डॉ. तुषार पाटील यांच्या वाहनामध्ये बेकायदेशीरपणे गर्भजल लिंग चाचणीसाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. पाटील यांचे शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन सील करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, महापालिकेने सदर केंद्राची नोंदणीही निलंबित केली असून, लवकरच त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.
महापालिकेला ‘आमची मुलगी’ या संकेतस्थळावर सातपूर येथील शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. तुषार पाटील यांच्या वाहनाबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिकेच्या डॉ. आरती चिरमाडे, डॉ. विजय देवकर आणि डॉ. जितेंद्र धनेश्वर या पथकाने सदर केंद्राची तपासणी केली. पथकाने डॉ. पाटील यांच्या मालकीच्या इनोव्हा वाहनाची (क्रमांक एमएच १५ बीडब्ल्यू ५९४९) तपासणी केली असता, गाडीच्या डिक्कीमध्ये रुग्णांची सोनोग्राफी करण्यासाठी गादी पसरवलेली होती आणि सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे दोन प्रोब, सोनी व्हिडीओग्राफिक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, दोन उशा, वेगवेगळे वायर कनेक्टेड, यूपीएस, की-बोर्ड, सोनोग्राफी जेल, टिश्यू पेपर आदी साहित्य आढळून आले. सदर साहित्य त्यांनी त्र्यंबक येथील नोंदणीकृत केंद्रावरून आणल्याचे आढळले. या कृत्यामुळे डॉ. पाटील यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. पीसीपीएनडीटी
कायद्याचे उल्लंघन
महापालिकेकडे सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथक नेमून त्याची तपासणी करण्यात आली. सदर केंद्राला महापालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र नाही. वाहनातून महापालिका हद्दीबाहेर चाचणी केली जात असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, शहरात कुठे बेकायदेशीरपणे गर्भजल लिंग चाचणी होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- डॉ. राजेंद्र भंडारी
वैद्यकीय अधीक्षक, मनपासहा महिन्यांपासून वॉचडॉ. तुषार पाटील यांच्या वाहनामध्ये बेकायदेशीरपणे गर्भजल लिंग चाचणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सदर वाहनावर महापालिकेचे वैद्यकीय पथक नजर ठेवून होते. वास्तविक डॉ. पाटील यांचे हे वाहन त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, चांदवड या भागात फिरायचे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून सदर डॉक्टरवर कारवाई अपेक्षित होती.;परंतु तशी कारवाई न झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सदर वाहन महापालिका हद्दीत फिरताना आढळल्याने अखेर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या डॉ. आरती चिरमाडे यांच्या पथकाने यापूर्वी दोन डॉक्टरांचाही बेकायदेशीरपणे चालणारा उद्योग उघडकीस आणला होता. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. तुषार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी नोटिसीला सादर केलेला खुलासा व त्यांचे म्हणणे सल्लागार समितीवर सादर केले असता त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील अतिरिक्त संचालक तथा राज्य समुचित अधिकारी यांनीही या प्रकरणी कार्यवाही करण्याचे पत्र दिले. त्यानुसार सोमवारी (दि.२०) डॉ. तुषार पाटील यांचे सातपूर येथील एमएचबी कॉलनीतील शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन डॉ. आरती चिरमाडे, डॉ. जितेंद्र धनेश्वर आणि डॉ. सुवर्णा शेफाळ यांनी पंचांच्या समक्ष सील करण्याची कारवाई केली. सदर केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली असून, लवकरच त्यांच्यावर न्यायालयीन कारवाईही केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशाप्रकारची गर्भ लिंग चाचणी उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title:  Shocking: action taken by municipal corporation; Shakuntal Sonography Center Seal in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.