पोलीस पाटलांनी वाचवले युवकाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 00:49 IST2018-12-18T00:48:53+5:302018-12-18T00:49:27+5:30
तरुणाने केले होते विष प्राशन : वेळेत उपचारामुळे मिळाले जीवदान

पोलीस पाटलांनी वाचवले युवकाचे प्राण
मोरगाव : तरडोली (ता. बारामती) येथे पोलीस पाटील बाळासाहेब जाधव यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आसु सोनगाव येथील अनिल सोनलकर या युवकाला जीवदान मिळाले. विषारी औषध प्राशन केलेल्या या तरुणास अर्धा किमी पाठीवर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत आणल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहे.
आसु सोनगाव (ता. बारामती) येथील तरुण अनिल भगवान सोनलकर (रा. तरडोली, ता. बारामती) येथील राखीव वनक्षेत्रामध्ये विषारी औषध प्राशन केले होते. याबाबत, दि. १३ रोजी रात्री ७ वाजता माहिती वनसेवक भालेराव, भोसले यांना समजल्यानंतर रुग्णवाहिकेस बोलाविण्यात आले. घटनेची माहिती समजताच मोरगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवलदार राजेंद्र चव्हाण, पोलीस पाटील बाळासाहेब जाधव घटनास्थळी पोहोचले. हा तरुण मुख्य जिल्हा मार्गापासून
सुमारे अर्धा किमी ओढ्याशेजारी पडला होता.
या ठिकाणी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. विषारी औषध प्राशन केल्यामुळे तरुण अत्यावस्थेत पडला होता. तरुणास तत्काळ मदत न केल्यास जिवास धोका पोहोचू शकतो, असा विचार पोलीस पाटील जाधव यांच्या मनात आल्यानंतर, त्यांनी खांद्यावर तरुणास उचलून अर्धा किमी अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत आणले.
जाधव यांनी दाखविलेल्या तत्पुरतेमुळे आसु येथील तरुणाचे प्राण वाचले आहे. या तरुणावर मोरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात
येत आहे.