पुण्यात सराफा दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:54 IST2022-02-11T09:56:22+5:302022-02-11T11:54:15+5:30
'मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले...'

पुण्यात सराफा दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले
पुणे : कोंढव्यातील सराफा दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही एका पोलीस अंमलदाराने धाडसाने झडप घालून त्याला पकडले. पोलीस अंमलदार अंकुश केंगले असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गोळीबार करणार्या सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) याला अटक केली आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.
गेल्या बुधवारी पहाटे आणि रात्री अशा लागोपाठ दोन दिवस उशिरापर्यंत सुरु असलेल्या मेडिकलच्या दुकानात शिरुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याअनुशंगाने गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी परिसरातील सर्व मेडिकल दुकानदारांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. तसेच गस्त घालण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास असताना दुचाकीवरुन सौद सय्यद व रुहान खान हे दोघे आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करु लागले. गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली. या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ लागले. त्याचे वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत तेथे येत होते. दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौध हा पिस्तुल घेऊन येत होता. तरीही न डगमगता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याच्या साथीदार पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर व अन्य पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकुश केंगले यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
याबाबत अंकुश केंगले यांनी सांगितले की, मी गस्त घालत जात असताना समोरुन आरडाओरडा करत दोन तीन मुले धावत येत असल्याचे दिसले. त्याचवेळी एकाच्या हातात पिस्तुल दिसले. पण मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याच्या हातातील पिस्तुल काढून घेतले.