कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) लगत असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडत गावामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.तसेच स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करू, असे सांगत सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.
१ जानेवारी अभिवादन कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, शिवसेनेचे अनिल काशीद, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, नवनाथ माळी, माजी उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य केशव फडतरे, माजी अध्यक्ष बबुशा ढेरंगे, माजी सदस्य उमेश गव्हाणे, कुंदा फडतरे, मीना ढेरंगे, विवेक ढेरंगे, राजेंद्र गवदे, अमीर इनामदार, राजेशसिंह ढेरंगे, सचितानंद कडलक, दीक्षांत भालेराव, प्रवीण खलसे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, पोलिस पाटील मालन गव्हाणे, संदीप कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत ढोले यांनी सांगितले की, अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले असून बसेसची संख्या व वाहनतळाची जागा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहे. भीमा नदीवरील पुलावर बांधकाम विभागाकडून संरक्षक जाळी २५ डिसेंबर पूर्वी बसवल्या जातील, असे सांगत सोशल मीडियावर चुकीचे मेसेज न टाकण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले की, मागील वर्षी अपुऱ्या बॅरिकेटिंगमुळे चेंगराचेंगरी झाली होती. त्यातून मार्ग काढत यावर्षी वाहनतळ व बॅरिकेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तर २०१८ च्या दंगलीचा आपल्या गावावर पडलेला डाग नक्कीच पुसून टाकायचा आहे, यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले.
नाव कोरेगावचे अन् निधी पेरणेला?
१ जानेवारी पासून कोरेगाव भीमा गावची सामाजिक हानीबरोबरच आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली असूनही गावच्या सर्व समाजाच्या वतीने सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न चालूच राहणार आहे मात्र प्रशासनाने गावासाठी भीमा नदीवर संरक्षक घाट, रस्ते, विद्युत दिवे व इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी गेल्या सहा वर्षात एक रुपयाही निधी दिला नाही तर या उलट पेरणे ग्रामपंचायतीला मोठा निधी देत आहात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल उपस्थित करून स्थानिक तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.