चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 17:29 IST2021-04-04T17:27:42+5:302021-04-04T17:29:42+5:30
आईला शिवीगाळ करून फोडली स्वतःचीच रिक्षा

चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी: एका एकाला खल्लास करेन, असे म्हणून हातात चाकू घेऊन एक तरुण पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन यांच्या अंगावर धावून गेला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून तरुणाला अटक केली आहे. तळवडे चौकात शनिवारी सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
अक्षय बलभीम जाधव (वय २२, रा. तळवडे), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस नाईक सचिन निघोट यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा त्याच्या आईला शिवीगाळ करून स्वतःच्या रिक्षाची काच दगड मारून फोडत असताना निघोट व ट्रॅफिक वॉर्डन संभाजी वाघमारे मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन अक्षय त्यांच्या अंगावर धावून गेला. एका एकाला खल्लास करेन, असे म्हणून त्याने दहशत निर्माण केली. तसेच निघोट सरकारी काम करीत असताना त्याने अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.