सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:29 IST2025-01-24T11:29:13+5:302025-01-24T11:29:49+5:30
चोरट्यांचा अमिषाला बळी पडू नका, सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना

सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’
पुणे : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यात सायबर लॅब सुरू करण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून गृहविभागाकडे याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे, असे पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे शहरातील वार्षिक गुन्ह्यांचा आढावा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी घेतला. यावेळी त्यांनी शहरातील वाढते सायबर गुन्हे आणि पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सायबर गुन्हे राेखण्यासाठी देशपातळीवरील तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. चोरट्यांचा अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.
मुंबईसह परिसरातील सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी नवी मुंबईत सायबर लॅब सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईप्रमाणे पुण्यातही सायबर लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याबाबत गृहविभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. पुण्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. सध्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात सायबर पोलिस ठाणे कार्यरत आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.