अदखलपात्र गुन्ह्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:53 IST2018-09-12T15:48:19+5:302018-09-12T15:53:18+5:30
अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले.

अदखलपात्र गुन्ह्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात
पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या पौड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक सापळा रचून बुधवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
पोलीस हवालदार तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (वय ४८, रा. स्वारगेट पोलीस वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांच्याविरूद्ध पौड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी आगवणे याने तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ त्या तक्रारीची ८ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात तडजोड करुन ३ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले़ त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी सापळा रचला़. पौड पोलीस ठाण्याच्या समोरील विश्रामगृहात ३ हजार रुपयांची लाच घेताना आगवणे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.