पीएमपी प्रवाशांकडील मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 21:26 IST2021-03-23T21:26:27+5:302021-03-23T21:26:52+5:30
63 हजारांचे 6 मोबाइल जप्त

पीएमपी प्रवाशांकडील मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : पीएमपी बसने प्रवास करणार्यांचे मोबाईल लांबविणार्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले असून त्यांच्याकडून ६ मोबाईल जप्त करण्यात आले.
कृष्णा नारायणा सातपाडी (वय ३३, रा. मुळ रा. गुंतकल, जि. अनंतपूर, आंध्र प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बस प्रवाशांकडील मोबाइल लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून चोरट्याचा माग काढण्यात येत होता. शिवाजीनगर भागातील पीएमपी थांब्यावर सातपाडी थांबल्याची माहिती पोलीस नाईक मोहसीन शेख यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याने शिवाजीनगर, हडपसर तसेच मध्यभागात बस प्रवाशांकडील मोबाइल लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याच्याकडून ६३ हजारांचे ६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, अस्लम पठाण, उत्तम तारू, चेतन गोरे, समीर पटेल आदींनी केली.